नाशिक
नाशिक । प्रतिनिधी ।
महानिर्मितीने औष्णिक वीज निर्मिती संचामधून विजेच्या शिखर मागणीच्या कालावधीमध्ये 8104 मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक प्रस्थापित केला.
महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना कमीत कमी वीज दरामध्ये सातत्यपूर्ण वीज पुरवठा करण्याकरिता महानिर्मिती नेहमीच योगदान देत आहे. महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13186 मे वॅट इतकी असून यापैकी औष्णिक विद्युत क्षमता 9750 मे वॅट इतकी आहे. आज महानिर्मितीच्या 7 औष्णिक वीज निर्मिती संचांमधून 8104 मेगा वॅट उच्चांकी तर एकूण 8680 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये भुसावळ वीज निर्मिती केंद्र संच क्र 4 व 5, चंद्रपूर संच क्र 8 व 9, खापरखेडा संच क्र 3 व 5 तसेच परळी संच क्र 6 व 8 आणि पारस संच क्र 3 यांनी 90 टक्के पेक्षा अधिक प्लांट लोड फॅक्टर सह वीज निर्मिती साध्य केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत करण्यात मोठी भूमिका बजावली असल्याने तसेच प्रभावी इंधन व्यवस्थापन, विविध उत्कृष्ट संचलन कार्यप्रणालीचा अवलंब करून कमीत कमी खर्चात महानिर्मितीच्या संचानी ही विक्रमी सातत्यपूर्ण कामगिरी साध्य करत वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे.
ऊर्जामंत्री व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे नेतृत्वाखाली महानिर्मितीनेही विक्रमी कामगिरी साध्य केली असून त्याबद्दल संचालक संचलन राजू बुरडे व कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे