अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी झिराडमध्ये वातानुकूलित सर्व सोयी सुविधांयुक्त असे कोव्हीड केअर सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमध्ये लागणार्या साहित्य, सुविधांची उपलब्धता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला असून 95 टक्के पेक्षा अधिक काम सेंटरचे झाले आहे. येत्या आठवड्यात हे काम पुर्ण होऊन कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर खुले होण्याची शक्यता आहे. कोरोना मुक्त गावासाठी कोव्हीड सेंटर उभारणारी झिराड ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतीने कोरोनामुक्त गावांसाठी पुढाकार घेतल्यास संपुर्ण गावे, वाड्या, तालुके, जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, कोरोनाचे निदान तातडीने व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून झिराड ग्रामपंचायत हद्दीत कोव्हीड सेंटर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. झिराड ग्रामपंचायत व साई क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने गावातच हे सेंटर सुरु करून झिराडसह आजूबाजूच्या गावांतील रुग्णांना सर्व सुविधांसह उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
झिराड ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून गावांमध्ये व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. परंतु गावांतील वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच त्यांना त्यांच्या आजारपणावर त्याच ठिकाणी उपचार करता यावे यासाठी याच व्यायामशाळेच्या इमारतीमध्ये अद्ययावत असे कोव्हीड केअर सेंटर उभारले जाणार आहे. गावांतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे. यासाठी व्यायामशाळेच्या इमारतीमध्ये कोव्हीड सेंटर उभारण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे 12 खाटांचे वातानुकूलित असे हे सेंटर असणार आहे. रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या मदतीसाठी झिराड गावांतील साई क्रीडा मंडळाचा सहभाग राहणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये याकडे प्राधान्य लक्ष दिले जाणार आहे. त्यांना लागणार्या अत्यावश्यक सेवादेखील मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून असलेल्या डॉक्टरांच्या मदतीने अन्य आजारांवरही उपचार करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून सर्दी, ताप, खोकला सारखी कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास मदत होणार आहे. कोरोनामुक्त गावासाठी झिराड ग्रामपंचायतीने शासनाच्या एक पाऊल पुढे जात प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना यश येणार आहे.
दिलीप भोईर, जि.प.सभापती
पहिली ग्रा.पं.
ग्रामपंचायत स्तरावर कोव्हीड सेंटर उभारणारी झिराड ग्रामपंचायत ही पहिली ठरणार आहे. यातूनच अन्य ग्रामपंचायतीनेदेखील पुढाकार घेतल्यास गावे, वाड्या कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.