रायगडच्या पर्यटनाला मिळणार उभारी; पर्यटन विकास आराखड्यास शासनाची मान्यता
। माणगाव । वार्ताहर ।
निसर्गरम्य (Raigad) रायगडच्या पर्यटनाला नव्याने उभारी मिळणार आहे. राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणार्या पर्यटनस्थळांचा खर्या अर्थाने विकास होण्यासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी तळा तालुक्यातील कुडा लेणी, माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
(Kuda) कुडा येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे. या लेण्यांची नोंद इ.स.1848 मध्ये सापडली असून सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे याठिकाणी आढळतात. भिक्षूंना राहण्यासाठी त्याकाळात व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. येथील लेण्यांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्राचीन बौध्द लेणींचा पर्यटनांत समावेश करून येथील विकास करण्यात येणार आहे. माणगाव तालुक्यातील देवकुंड-पाटणूस धबधब्याच्या पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.
कुंडलिका नदीच्या तीन प्रवाहांचा इथे संगम होऊन जवळजवळ 80 फूटांवरून कोसळणारा देवकुंड धबधबा गोड्या पाण्याचा एक सुरेख तलाव निर्माण करतो. नदी, पर्वत आणि सोबतीला रमणीय जंगल असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत उत्तम वेळ घालवण्यासाठी व ट्रेकिंग, कॅम्पिंगसाठी हे ठिकाण आदर्श असेच आहे.
देवकुंड धबधबा मुंबईपासून साधारण 170 कि.मी. अंतरावर रायगड जिल्ह्यातील भिरा पाटणूस नावाच्या गावात आहे. हे गाव ताम्हिणी घाटाजवळ आहे. वर्षभर इथे भेट देण्यास पर्यटकांची मोठी पसंती असली तरी पावसाळ्यात इथला निसर्ग विराट रूप दाखवतो. भिरा गावातून साडेचार किलोमीटरचा ट्रेक आहे. या पर्यटनस्थळांचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.