नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाईन व्यवहार बंद
। चिरनेर । वार्ताहर ।
अलीकडे बँकेचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. परंतु उरण तालुक्यातील चिरनेर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने नेटवर्कसाठी बसविलेला व्हीसॅट अन्टींना बँकेला जागा देणार्या मालकाने काही कामानिमित्ताने काढल्याने नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली असून ऐन सणासुदीत बँकेचे सर्व ऑनलाईन व्यवहार बंद झाले आहेत.
नेटवर्क अभावी बँकेचे सर्व महत्त्वपूर्ण व्यवहार थांबले असून बँक ग्राहकांना पैशाची देवाण-घेवाण करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असून बँक ग्राहक बँकेच्या गलथान कारभारामुळे संताप व्यक्त करत आहेत. तर बँक कर्मचार्यांना ग्राहकांना दररोज नवीन कोणते समाधानकारक उत्तर द्यायचे हा देखील बँक कर्मचार्यांच्या पुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत जोपर्यंत बँक भाडे मालक नेटवर्कसाठी बसविलेला व्हीसॅट अँटीना योग्य जागेवर बसवत नाही, तोपर्यंत बँकेचे कामकाज सुरू होणार नाहीत असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बँक ग्राहक व बँक कर्मचारी वैतागले आहेत.