मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था; गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल
। अलिबाग । वर्षा मेहता |
गणोशोत्सव उद्यावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग असो किंवा पेण, वडखळ, पेण-खोपोली, अलिबाग- रोहा, सुधागड आदि विविध मार्गांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यातील चाकरमानी भाविकांच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न असल्याचे स्पष्ट होत आहे. महामार्गावरील जीवघेणे खड्डे आवासून उभे आहेत. महाड-वडखळ या मार्गावर मोजक्याच ठिकाणी तात्पुरती रस्त्यांची मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास तरी कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा प्रवास याच खड्ड्यांतून होणार असल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जागोजागी उखडलेले रस्ते, खड्ड्यांचे साम्राज्य, चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे झालेले अरुंद रस्ते यांमुळे चाकरमान्यांना यंदा गणेशोत्सवासाठी कोकण गाठणे कठीण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुंबई-गोवा हायवेची अक्षरशः चाळण झाली आहे.
गणेशोत्सवात मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणार्यांची संख्या लाखोंमध्ये असते. परंतु, यावर्षी मुंबई-गोवा हायवेवरून जाणार्या चाकरमान्यांसमोर रस्त्यांच्या गंभीर परिस्थितीचे संकट निर्माण झाले आहे. गोवा रस्ता अगोदरच अरुंद असून विविध ठिकाणी सुरू असणार्या चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणखीनच अरुंद झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे (एनएचआयए) रस्ते दुरुस्तीसाठी तगादा लावूनही उपयोग होत नसल्याचे लोकप्रतिनिधी आणि वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. हायवेच्या दुरवस्थेविषयी वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही काहीही उपयोग झालेला नाही.
9 सप्टेंबरला कोव्हिड संदर्भातील लेखी स्वरुपात नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी याबाबत सर्वांना कळविण्यात येईल.
-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी
या मार्गांचा पर्यायी वापर
वेळेत गाव गाठायचे असल्यास या मार्गाचा वापर करावा
-तरणखोप-पेण बायपास-गागोदे-वरसई-पालीफाटा-परळी- जांभूळपाड- पाली- वाकण
– वडखळ-पोयनाड-पेझारी चेकपोस्ट-कुर्डूस- नागोठणे- वाकण
– नागोठणे-वेलशेत फाटा- वरवठणे- भिसेखिंड- वाकण
-वाकण-पाली- नांदगाव- विळे-सुतारवाडी-कोलाड
-वाकण-पाली- नांदगाव- विळे-निजामपूर-माणगाव
-वाकण-पाली- नांदगाव- विळे-निजामपूर-माल्याचीवाडी- बोरवाडी-जांभुळवाडी- ढालघरफाटा
– कोलाड-सुतारवाडी-विळे-निजामपूर-माणगाव
– माणगाव-मोर्बानाका-मोर्बा गाव- दहिवली- गोरेगाव- लोणेरे
-लोणेरे-गोरेगाव-नांदवी-आंबेत-टोळफाटा- म्हाप्रळ
– राजेवाडी- शिरगाव चेकपोस्ट-विन्हेरे- खेड
अपघातप्रवण 44 ठिकाणे
-मुंबई-पुणे दु्रतगती मार्ग- खोपोली एक्झीट, अंडा पॉईंट, ढेकू गाव, आडेाशी, कलोते, लोधीवली, मांडप बोगदा ते लोधीवली, पानशिल, रिसवाडी
-मुंबई गोवा महामार्ग- खारपाडा ब्रिज, खरोशीफाटा, तरणखोप, रामवाडी, वाशीफाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळीखिंड, तळवली, पुई, मुरावली, कशेणे, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव पेट्रोलपंप, गोरेगाव बस स्थानक, लोणेरे बस स्थानक, टेमपाले ते लाखपाले-पहेल महामार्ग, गांधारपाले, वीर, वीरफाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले, चारफाटा, तिनविरा, तासगाव.