। वावोशी । वार्ताहर ।
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य आणि विचारांनी प्रेरित होऊन खालापूर तालुक्यातील आंबेडकरप्रेमी शिक्षकांनी एकत्र येऊन आंबेडकरवादी प्रबुद्ध शिक्षक संघाची उभारणी केली असून त्याचा उद्घाटन सोहळा खोपोलीमधील लोहाना समाज हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी दिलेला बुद्ध धम्म आणि त्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार करणार्या संघटनांमध्ये सहभागी होऊन तो विचार समाजामध्ये कसा पोहोचवता येईल तसेच त्या कार्याला उत्तेजन देण्याचे काम कशा प्रकारे करता येईल असे नियम आंबेडकरी प्रबुद्ध शिक्षक संघाच्या घटनेमध्ये नमूद करा असा आशावाद व्यक्त करीत मार्गदर्शनपर विचार गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ, आदर्श शिक्षक अरविंद वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे खोपोली शहर अध्यक्ष बंडू कदम,अनंत शिंदे, अरुण गायकवाड, भाई ओव्हाळ, प्रशांत गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.