। सुतारवाड । वार्ताहर ।
दरवर्षी सुतारवाडी नाक्यावर होणारी दहीहंडी या वर्षी अगदी साधेपणाने शासनाचे नियम पाळून अगदी थोडक्यात साजरी करण्यात आली. सुतारवाडी नाक्यावरील दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कै. दत्ताजीराव तटकरे आणि स्वा. सैनिक कै. बापूसाहेब रसाळ या दोन विभुतींनी गेल्या 46 वर्षापूर्वी सुतारवाडी नाक्यावर दहीहंडी आणि दसरा स्नेहसंमेलन या सणांची मुहूर्तमेढ रोवली होती. दत्ताजीराव तटकरे आणि बापूसाहेब रसाळ हे दोघेही हयात असताना नियमितपणे या दोन सणांना उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समवेत सण साजरा करायचे. यावेळीही खा सुनिल तटकरे,आ.अनिकेत तटकरे सहभागी झाले होते.
कोरोनाच्या सावटामुळे बाजारात आकर्षक रंगात सजावट केलेले मडके विक्रीस उपलब्ध होते. मात्र विक्रेत्यांना यावेळी ग्राहकांची मोठी प्रतीक्षा करावी लागली. कोरोनाच्या सावटामुळे लहान व्यापार्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या वर्षी दहीहंडीच्या दिवशी पहाटे पासूनच मुसळधारपणे पाऊस पडत होता. त्यामुळे बाळगोपाळांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.