होल्डरची झुंज अपयशी, पंजाबचा 5 धावांनी विजय
अबू धाबी | वृत्तसंस्था |
पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी खेळविल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने पाच धावांनी हैदराबादवर मात केली. नऊ सामन्यांत आठव्या पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
जेसन होल्डरच्या (3/19 आणि नाबाद 47) अष्टपैलू खेळानंतरही पंजाब किंग्जविरुद्ध ‘आयपीएल’ क्रिकेटच्या शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच 120 धावाच करु शकला.
दरम्यान, पंजाब किंग्जने 20 षटकांत 7 बाद 125 धावा केल्या. यात कर्णधार के. एल. राहुल (21) व एडीन मार्करमचे (27) महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतर हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 120 धावाच करता आल्या. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नर (2) आणि कर्णधार केन विल्यम्सन (1) यांना झटपट माघारी धाडले. मधल्या षटकांत फिरकीपटू रवी बिष्णोईने 24 धावांत तीन बळी घेत हैदराबादला अडचणीत टाकले. उत्तरार्धात होल्डरला वृद्धिमान साहा (31) वगळता इतरांची साथ लाभली नाही.