पत्रकार परिषदेतून आपलाच सहभाग असल्याची दिली कबूली!
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील विहुर येथील गुरचरण जमिनीच्या विक्रीसंदर्भात कृषीवलने प्रकाश टाकल्यानंतर जागेच्या व्यवहाराबाबत आमदार जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता राजा व्यापारी तर प्रजा भिकारीच होणार अशी टिका करीत राजकीय दबावापोटी सीआरझेड असतानाही गुरचरण जमिनीवर खाजगी बांधकाम करण्याचा अट्टाहास करण्यात आला असल्याचा आरोप केला. मात्र हे आरोप आपल्यावर करण्यात आले असल्याचा दावा करीत अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खाई त्याला खवखवे या उक्तीनुसार आपलाच या सहभाग असल्याची कबूलीच दिली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून विहुर येथील जागा गुरचरण असेल तर ग्रामस्थांना ती परत मिळवून देणार अशी दर्पोक्तीही दळवी यांनी यावेळी केली. ही दर्पोक्ती करतानाच आपला यात सहभाग असल्याचे एकप्रकारे कबुलीच आपण देत आहोत याचाही आमदारांना विसर पडला. शेकापक्षातर्फे करण्यात आलेल्या कोरोना काळातील कामामुळे पायाखालची वाळू घसरत चाललेल्या आमदारांनी या कामावरही टिका करण्याचा हास्यास्पद प्रकार केला. ग्रामस्थांना कायदेशीर लढाई लढण्याचा सल्ला देणार्या आमदारांनी विहूर येथील कारवाईसाठी पोलिसांनी आणि शासकीय अधिकार्यांनी जनतेवर केलेल्या अत्याचारावर मात्र एकही शब्द काढला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील नवाब कालीन रौद हि जागा गुरचरण असून कोणत्याही खाजगी मालकाला या ठिकाणी बांधकाम करू देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे आज विहूर गावाला रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स सह असंख्य पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. याप्रसंगी मुरुड पोलिसांनी प्रमुख आंदोलन करते पैकी 14 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यामुळे आज विहूर येथे शांतता पहावयास मिळाली आहे. शनिवारी असंख्य लोक एकत्र येऊन मोठा प्रतिकार या ठिकाणी ग्रामस्थांनी केला होता. परंतु प्रमुख मंडळी पोलिसांच्या ताब्यात राहिल्यामुळे आज कोणतेही आंदोलन अथवा प्रतिकार या ठिकाणी होऊ शकलेला नाही. या प्रकरणाची शांतता पहाताच खाजगी मालकाने विहूर रौद परिसरात असंख्य मजूर आणून लोखंडी पोल खड्ड्यात गाढून त्यावर तारा बांधण्याच्या कामाला मोठा वेग प्राप्त झाला आहे. असंख्य मजूर खड्डा खोदण्याचे व पोल गाढण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. जेसीपी व तारांच्या बदलाचे खच या ठिकाणी आणण्यात आले होते. सुमारे 25 एकर चा परिसर असलेला विहूर रौद हि जमीन खूप मोठी असून येथे गुरुचरण बरोबरच क्रिकेट चे सामने तसेच भारतीय नौदलाचे प्रशिक्षण सुद्धा होत. नेव्ही च्या हेलिकॅप्टर सुद्धा येथे उतरत असत. परंतु ग्रामपंचायत च्या अखत्यारीत असणारी गुरचरण जमीन खाजगी मालकाने विकत घेतल्यामुळे येथील ग्रामस्थांनी मोठा आक्रोश व्यक्त करून आपला विरोध दर्शवला होता. आज सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसून आला आहे. पोलीस सुरक्षेतच वॉल कंपाउंड च्या बांधकामाने वेग प्राप्त केला आहे. याबाबत विहूर ग्रामपंचायत च्या माजी सरपंच व प्रमुख आंदोलनकर्त्या मुशरत उलडे यांनी सांगितले कि, लवकरच आम्ही मुंबई उच्चं न्यायालयात गुरुचरण जमिनीबाबत उच्चं न्यायालयात दाद मागणार आहोत.
आमच्याकडे विहूर रौद च्या गुरचरण जागेबाबतची ग्रामपंचायत रेकॉर्ड बरोबरच महसूल खात्याची जुनी कागदपत्रे असून या कागदपत्रांच्या साह्याने सदर सुरु असलेल्या कामाला स्टे मिळवून पुढील न्यायालयीन लढाई ग्रामपंचायत च्या वतीने आम्ही लढवणार आहोत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आव्हाड यांच्याकडे सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली आहेत. आमच्या प्रमुख व्यक्तींना मुरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जागा विकणारा व जागा विकत घेणारा विहूर ग्रामस्थांच्या समोर येत नाही. जागा मोजणीच्या क प्रमाणपत्रावर खरा मालक उपस्थित नसताना सुद्धा त्याची हजेरी दाखवण्यात आली आहे. तहसीलदार मुरुड या ठिकाणी भेट देतात सी आर झेड 1 या परिक्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत असताना सुद्धा हे काम सुरु ठेवण्यात येते. गरिबांसाठी कायदा आहे व श्रीमंतांसाठी कायद्याचे बंधन नाही या सारखे दुर्दैव काय असा प्रतिप्रश्न सुद्धा यावेळी उलडे यांनी केला आहे. सध्या विहूर मध्ये तणावपूर्ण शांतता दिसत असून येथील ग्रामस्थांनी न्ययालयीन लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे. ते सुद्धा थेट मुंबई येथील उच्चं न्यायालय गाठल्यामुळे लवकरच या प्रकरणातील सत्य लोकांसमोर येणार आहे.