पेण | वार्ताहार |
मनविसेचे रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील यांचे बंधू तथा पेण तालुका मनसे सचिव निकेश वासुदेव पाटील विरूध्द पेण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य खात्याने जी इंजेक्शन विशिष्ट आजारावर अगर व्याधीवर वापरण्यास मुभा दिलेली आहे ती इंजेक्शन चोरून आणून चिंचपाडा येथील आपल्या एक्स्ट्रीम न्युट्रेशन दुकानात बेकायदेशीररित्या विक्री करत असत. यामध्ये स्टॅनझोलाल, मास्टबोलीन, ऍस्ट्रॅलिन, डिनबोल, रेक्झोबोल, थायरो 3, ऑस्किड्रोलोन, ओक्झानोबोल या अंमली पदार्थाचा (इंजेक्शनांचा) समावेश आहे. एकूण 1 लाख 23 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
निकेश पाटील हा व्यावसायिक पध्दतीने पेण मध्ये या अगोदर व्यायामशाळा चालवत होता. व्यायाम शाळेच्या मार्गाने तरुण वर्गाला झटपट बॉडी होण्यासाठी स्टेनोझोलॉल,मास्टबोलीन,आयसोलीन,डायआनाबॉल,रेक्सोबोल,थायरो 3, ऑक्सॅन्ड्रोलोन, ऑक्सॅनाबॉल या अंमली पदार्थाचा (इंजेक्शनांचा) मोठया प्रमाणात पैसे वसूल करून विकत असत. तरूण वर्गाला या बाबत काही दुष्परिणाम होतात याची माहिती न देता हा गोरख धंदा करत असत. दोन दिवसांपूर्वी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने चिंचपाडा येथील दुकानावर छापा टाकून आठ प्रकारचे आम्ली पदार्थ जप्त केले. आताच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 1 लाख 23 हजार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक किशोर मुनीराजजी राजने यांनी पेण पोलीस ठाण्यात निकेश विरूध्द गुन्हा दाखल केला असून पेण पोलीस ठाण्यात भादवी कलम 336,379, व औषध व सौदर्य प्रशासन कायदा 1940 चा कलम 18 (क) सहभाग कलम 27 (बी) (ळळ) नुसार गुन्हा दाखल झाला असून या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पिंपळे करत आहेत.