भर पावसात सॅनिटायझर मारण्याचे प्रताप
उरण | प्रतिनिधी |
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज चाणजे ग्रामपंचायत कर्मचारी भर पावसात करंजा गावात सॅनिटायझर मारीत होते. पडणार्या पावसात सॅनिटायझर मारून त्याचा फायदा काय होईल तसेच नक्कीच सॅनिटायझर मारीत होते की काय दुसरे तसेच काही प्रमाणात सॅनिटायझर मारून बिल काढण्याचा हा नवा फंडा तर नाही ना अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू आहे. तरीही येनकेन मार्गाने पैसे काढण्याचे प्रताप सुरूच आहेत. याबाबत ग्रामसेवकाकडे तक्रार करूनही दे लक्ष देण्याऐवजी त्यांची पाठराखण करीत असल्याने ते भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी निधीही मिळाला आहे. परंतु या निधीचा वापर योग्य कामासाठी होताना दिसत नाही. त्यामुळे उरण परिसरातील पंचायत समिती अधिकारी वर्ग व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामसेवक हे याकडे हवेतसे लक्ष देताना दिसत नाही.
आज दिवसभर पाऊस पडत असतानाही चाणजे ग्रामपंचायतीने कर्मचार्यांना भर पावसात सॅनिटायझर मारण्यास सांगितले. पावसात सॅनिटायझर मारून त्याचा फायदा काहीच होणार नाही. याबाबत ग्रामस्थांनी कर्मचार्यांकडे विचारणा केली असता त्यांनी आम्ही सांगूनही कोणी ऐकत नाही. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून बिल काढण्यासाठी चाणजे ग्रामपंचायतीने भर पावसात सॅनिटायझर मारण्याचा नवा फंडा सुरू केला असल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. तरी वरिष्ठ अधिकार्यांनी याची खबरदारी घेऊन चाणजे ग्रामपंचायतीची भ्रष्टाचारातून मुक्तता करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.