। पाली/बेणसे । वार्ताहर ।
महिलांना समाजकारण व राजकारणात सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. 50 टक्के आरक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. पालीत बचत गट सभागृह उभारण्याची संकल्पना आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ.अनिकेत तटकरे यांनी दिली. पालीत अंगणवाडी सेविका, महिला बचत गट व भजनी मंडळ यांना सोमवार (दि.20) आ.अनिकेत तटकरे, गीता पालरेचा यांच्या हस्ते विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून जनसेवा केली. सामाजिक बांधिलकी जोपासत अविरतपणे आपले कर्तव्ये बजावणार्या या सेवाभावी घटकांचे करावे तितके कौतुक थोडेच. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न व सहकार्य करणार असल्याचे आ. तटकरे यांनी आश्वासित केले. यावेळी अंगणवाडी सेविका यांना जीवनावश्यक साहित्य तसेच महिला बचत गट व भजनी मंडळ यांना रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ते साहित्य वाटप केले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, माजी सभापती साक्षीताई दिघे, महिला तालुका अध्यक्ष रुपाली भणगे, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, महिला शहर अध्यक्ष सुजाता वडके, तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सुलतान बेनसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.