जुनी शाळा, सहा इमारतींसह
सहा एकर जागेसंबंधीचा भाडेतत्त्वकरार
अलिबाग | प्रतिनिधी |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.यासाठी आरसीएफ कॉलनीतील जुन्या शाळेसह सहा इमारती आणि सहा एकर जागेसंबंधीचा भाडेतत्वाचा करार नुकताच करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा, टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा प्रति विद्यार्थी रु.2 हजार प्रति सेमिस्टर (शासकीय वसतीगृह शुल्क) इतक्या भाडयाने 3 वर्षाकरिता घेण्यास व त्यानुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व आणि संशोधन यांनी सादर केलेल्या सामंजस्य कराराच्या मसुद्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या भाडेतत्त्वकराराची प्रत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर व आरसीएफ. थळचे मुख्य व्यवस्थापक एस.डी.देशमुख आणि मनुष्यबळ तथा प्रशासन व्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी यांनी परस्परांना सुपूर्द केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पालकमत्र्यांंचे खासगी सचिव डॉ.जगन्नाथ वीरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अलिबाग कार्यकारी अभियंता राहूल मोरे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ यांची उपस्थिती होती.
या भाडेकरारानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी ज्या महिन्यात प्रथम निरीक्षण होईल त्या महिन्यापासून भाडेपट्टी करार अंमलात येईल. या भाडेकराराची मुदत 3 वर्ष राहील. या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळाल्यानंतरच या जागेबाबतचे भाडे अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.