आषाढी दिंडी गावोगावी साजरी करण्याचे रामकृष्ण मोकलांचे आवाहन
खरोशी । वार्ताहर ।
अखिल भारतीय वारकरी मंडळाची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष हभप रामकृष्ण महाराज मोकल यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर मंदिर वडखळ येथे शासनाचे सर्व नियम पाळून योग्य अंतर ठेवून घेण्यात आली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिते विभाग विश्वनाथ पाटील दिंडी व सप्ताह समिती प्रमोद म्हात्रे तसेच रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धनाजी घरत, जिल्हा उपसचिव घनश्याम महाराज मोकल यांच्यासह तालुका कार्यकारिणीवर निवड झालेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोकल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना रामकृष्ण मोकल यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावर्षीही आषाढी दिंडी सोहळा होईल का नाही हे सांगता येत नाही. पण विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने पेण तालुक्यातील गावागावात शासकीय नियमांचे पालन करत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोजक्याच वारकरी यांच्या उपस्थितीत साजरा करणार असून सर्व वारकर्यांनी या दिंडी सोहळ्यात सामील होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.