| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 रायफल, स्फोटकं आणि कागदपत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना समुद्रकिनारी ही बोट संशयास्पदरित्या दिसली. त्यानंतर पोलिसांनी झाडाझडती घेतली असता यात शस्त्रास्त्र आढळल्याने हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, श्रीवर्धन येथे समुद्रकिनारी ही संशयास्पद बोट आळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 रायफल, 225 काडतुसे, कॉन्फरन्स केबल, कॉम्प्युटर आणि कागदपत्र आढळली आहेत. ग्रामस्थांना या बोटी आढळून आल्यानंतर त्यांनी त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यात बंदुका आढळल्या.
दरम्यान, याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. ही सर्व हत्यारे खरी आहेत की खोटी याचाही तपास सुरू आहे. ‘नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन’ असा लोगो या बोटीवर आहे. ही शस्त्रास्त्र पुरवणारी ब्रिटनची कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच बोटीमध्ये एकही व्यक्ती नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच एटीएसचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.