| नेरळ | वार्ताहर |
कळंब-नेरळ-माथेरान राज्य मार्ग रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्ट्या खोदून त्यात केबल टाकल्या जात आहेत. या केबलसाठी बेकायदा रस्ते खोदले जात असून रात्री एक दुचाकीस्वार त्या खड्ड्यात आपल्या गाडीसह कोसळला. त्यामध्ये तो किरकाळ जखमी झाला. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा खोदकाम करणार्यांवर कारवाई करणार आहे काय? असा प्रश्न दुचाकीस्वार यांनी उपस्थित केला आहे.
नेरळ-कळंब राज्य मार्गांवरील वरई ते पोही दरम्यान रस्त्याच्या बाजूला एका खाजगी कंपनीचे लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या बाजूला साईडपट्टी खोदून त्यात लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही. काम सुरु असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले नाहीत. तसेच हे काम करत असताना खड्डे खोदून माती दगड पूर्ण रस्त्यावर आले आहेत. यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
कळंब-नेरळ रस्त्यावर दिवसभर वाहनांची खूप वर्दळ असते. कळंब, वारे ओलमन परिसरातील नागरिक या मार्गांवरून प्रवास करत असतात. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास बोरगाव गावातील युवक सतीश पाटील हा दुचाकीवरून घरी परत असताना पोशीर गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्यात गाडी कोसळून अपघात झाला. समोरून येणार्या वाहनाने अंगावर गाडी आणल्याने सतीश पाटील यांनी आपली गाडी बाजूला काढून आपला जीव वाचवला. दैव बलत्तर म्हणून सतीश पाटील यांचे प्राण वाचले असले तरी मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जीव जाऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सतीश पाटील यांनी केली आहे.