I पोलादपूर I प्रतिनिधी I
जनशिक्षण संस्थान अलिबागमार्फत पोलादपूर तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना आत्मनिर्भर तसेच स्वावलंबनासाठी विविध अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येऊन पुरूषांच्या बरोबरीने संसाराचा गाडा चालविण्याची ताकद देण्याचे काम गावोगाव प्रशिक्षण वर्ग सुरू करून केले जाईल, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी जाकमातानगर येथील प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभप्रसंगी दिली.
याप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगड अलिबागचे संचालक विजय हिरामण कोकणे, माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार, कार्यक्रम सहाय्यक सुकन्या सचिन नांदगावकर, कार्यक्रम सहाय्यक हिमांशू अविनाश भालकर आदी उपस्थित होते. यावेळी तीन महिने कालावधीचा शिवणकला प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार पालकर यांच्या हस्ते प्रशिक्षिका अस्मिता उमेश पवार यांना अधिकृत नियुक्तीसह ओळखपत्र प्रदान करून करण्यात आला. याप्रसंगी लिक्विड हँडवॉश व सॅनिटायझिंग स्प्रे याबाबत महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी संचालक विजय कोकणे, माजी नगराध्यक्ष उमेश पवार यांनी सर्व उपस्थितांना जनशिक्षण संस्थानचे विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.