मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसे यांनीही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळाच तर्कवितर्क रंगले आहेत.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौर्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी आल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
31 मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकार्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान या भेटीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी इतक्या वर्षात कधीच पाहिली नाही. मी असं वातावरणच कधी पाहिलं नाही. या संपूर्ण देशामध्ये मला कळतच नाही की कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा राजकीय मित्र आहे. यांच वाजलंच आहे, असं एकवेळ आपल्याला असं वाटायला लागतं आणि दोन दिवसांनी कळत दोघंही एकमेकांना भेटले आणि दोघांनी एकमेकांशी चर्चा केली, असं राज ठाकरे म्हणाले.