भारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट

गेल्या सात दिवसांत श्रीलंकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे भारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील विषाणू आमच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे, असे श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅश्‍ले डीसिल्वा यांनी म्हटले आहे.तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची ही मालिका याआधी जून महिन्यात खेळवण्यात येणार होती, पण कोरोनामुळे ती एक महिना लांबणीवर टाकण्यात आली. सद्यपरिस्थितीत श्रीलंका मंडळाने भारताविरुद्धचे सर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारताचे प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी इंग्लंडमध्ये व्यग्र असतील. त्यामुळे भारताने या दौर्‍यासाठी दुय्यम संघ पाठवण्याचे ठरवले आहे. याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की,पांढर्‍या चेंडूवर अप्रतिम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यात संधी देण्यात येणार आहे. भारताचा हा संघ वेगळा असेल.

कोरोनाच्या काळातही आम्ही इंग्लंड आणि अन्य देशांविरुद्धच्या मालिकांचे यशस्वीपणे आयोजन केले होते. भारताचा श्रीलंका दौराही आम्ही यशस्वी करून दाखवू, पण सध्या कोरोनाचे वाढते संकट हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, हीच आमची इच्छा आहे.

-अ‍ॅश्‍ले डीसिल्वा, श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Exit mobile version