टोक्यो | वृत्तसंस्था
कोरोनाचा कहर वाढत चालला असून तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध वाढू लागला आहे. भारत, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून मोठया प्रमाणावर खेळाडू येणार असून त्यांच्याकडून जपानमधील जनतेला करोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जपानचे विरोधी पक्षनेते युकीओ इडानो यांनी केली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे अनेक देशांतून येणार्या करोना विषाणूच्या विविध रूपांचे प्रदर्शन ठरणार आहे. त्यामुळे जपानमध्ये हा विषाणू अधिक जोमाने पसरण्यास मदत होईल. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा झाल्यास जपानमधील लोकांचे रक्षण करणे तसेच त्यांचे आरोग्य आणि जीवनशैली अबाधित राखणे अशक्य होईल, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. भारत, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंकडून जपानमधील लोकांच्या जीविताला सर्वाधिक धोका आहे,फफ असेही इडानो यांनी म्हटले आहे.
भारतातील कोरोना विषाणूचे बी. 1.617, ब्रिटनमधील बी. 1.1.7 तसेच दक्षिण आफ्रिकेतील बी. 1.351 हे अवतार अधिक घातक आणि वेगान पसरणारे आहेत. या विषाणूच्या नव्या रूपांमुळेच भारत आणि ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जपानचा दौरा रद्द केला आहे. बाख हे सोमवारी हिरोशिमा येथे भेट देऊन ऑलिम्पिक ज्योत कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यानंतर ते टोक्योला भेट देणार होते.