| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, हॉस्पिटलने आरोग्य सेवा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामुळे नांदगाव पंचक्रोशीसह परिसरातील पात्र रुग्णांना शासनाच्या योजनेंतर्गत मोफत व कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
या योजनेंतर्गत पार पडलेली ही पहिली शस्त्रक्रिया ओपन रिडक्शन इंटरनल फिक्सेशन स्वरूपाची होती. ही शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक गुंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान आणि अनुभवी वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
आयुष हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्णांचा विश्वास संपादन केला असून, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत व कॅशलेस पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील उपचार खर्चाचा मोठा भार कमी होणार आहे.
यावेळी आयुष हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. नूतन माळी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना असून पात्र नागरिकांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या योजनेमुळे अनेक गंभीर आजारांवरील उपचार आर्थिक अडचणींशिवाय घेणे शक्य झाले आहे. आयुष हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत व कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आयुष हॉस्पिटलचे संपूर्ण वैद्यकीय पथक, परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा त्यांच्या जवळच उपलब्ध करून देण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.







