नदी प्रदूषणावरून राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनेसेचे आंदोलन
| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता थेट संघर्षाच्या पवित्र्यात आली आहे. महाड एमआयडीसी प्रशासनाच्या मनमानी आणि उदासीन कारभाराला जाब विचारण्यासाठी येत्या गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 120 वाजता महाड एमआयडीसी प्राधिकरण कार्यालयावर मनसेचा भव्य धडक मोर्चा धडकणार आहे. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाड एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी, स्थानिक भूमीमपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांची केली जाणारी भरती, शिवस्वराज्याच्या राजधानीत मराठी पाट्यांकडे होणारे दुर्लक्ष तसेच पोलादपूर ते महाड या मार्गावरील कामगारांसाठी बससेवेचा प्रश्न यांसारख्या विषयांवर एमआयडीसी प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक विकासासोबतच स्थानिकांच्या हक्कांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस भूमिका आणि कार्यवाहीची मागणी मनसेतर्फे करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी दक्षिण रायगड जिल्ह्यातील मनसैनिक, स्थानिक नागरिक, कामगार आणि भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “भूमिपुत्रांचा हक्क, महाराष्ट्राचा स्वाभिमान” या घोषवाक्यासह मनसेने या आंदोलनाला दक्षिण रायगडच्या जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जिल्ह्याची ताकद दाखवावी, असे आवाहन केले आहे.







