केंद्रीय गृहसचिव अध्यक्षपदी, तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमान दुर्घटनेच्या कारणांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी होणार असून, तीन महिन्यांत त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी शनिवारी सांगितले.
विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) नेतृत्वाखाली या अपघाताचा तपास आधीच सुरू आहे. मात्र, एएआयबीचा तपास तांत्रिक आणि विशिष्ट आहे. तर सरकारची उच्चस्तरीय समिती अधिक समग्र दृष्टिकोनातून तपास करेल आणि विमान वाहतूक सुरक्षा परिसंस्थेला अधिक बळकट करण्याचा विचार करेल, असे नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही समिती अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी जारी केलेल्या विद्यामान मानक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांचे परीक्षण करेल आणि भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे सुचवेल, असेही त्यांनी सांगितले.
गृह सचिव अध्यक्ष असलेल्या या समितीत नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, गुजरात सरकार, हवाई दल, गुप्तचर विभाग, नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभाग आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह इतर विविध विभाग आणि यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती नायडू यांनी दिली. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणांशिवाय ‘राष्ट्रीय सुरक्षा रक्षक’चे (एनएसजी) एक पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनमधील अनिवासी भारतीयांनी विमान दुर्घटनेतील पीडितांच्या ब्रिटनमधील कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी निधी संकलनाचे काम सुरू केले आहे.
एअर इंडियाची 25 लाख रुपयांची मदत
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी टाटा ग्रुपनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या नातेवाईकांना तातडीची अतिरिक्त 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यात अतिरिक्त 25 लाख रुपये म्हणजे एकूण सव्वा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन यांनी सांगितलं की, एअर इंडिया व्यवस्थापन पथक अमहदाबाद शहरात आहे. संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जो वेळ लागेल तोपर्यंत आम्ही अहमदाबादमध्ये उपस्थित राहू. तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी, एअर इंडिया मृतांच्या कुटुंबियांना आणि वाचलेल्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची अंतरिम भरपाई करेल, असे विल्सन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विमान कंपनीचं पथक पीडितांच्या कुटुंबियांशी पुनर्मिलन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी अधिकारी काम करत आहेत. त्यांनी परिस्थितीचं स्वरूप लक्षात घेता तातडीच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी हे ही स्पष्ट केलं की, एअर इंडिया त्यांच्या बोईंग 787 विमानाची खबरदारीची सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर विमानाचा डेटा रेकॉर्डर सापडला आहे आणि तो अपघाताच्या अधिकृत चौकशीत वापरला जाणार आहे.एअर इंडियानं ट्विटद्वारे ही घोषणा देखील केली की, प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबांसोबत एअर इंडिया आहे. या अविश्वसनीय कठीण काळात काळजी आणि पाठिंबा देण्यासाठी जमिनीवर आमचं पथक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.