सुरगडावर सापडली शिवकालीन तोफ
| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सुरगडावर स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या माध्यमातून दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत रविवारी (दि.19) शिवकालीन तोफ व काही अवशेष सापडले असल्याने स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना यश आले आहे.
छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सुरगड येथे झालेली दुर्दशा पाहून इथला स्थानिक मावळा सूरगडाच्या संवर्धनासाठी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेमार्फत झटू लागला आहे. आजतागायत संस्थेच्या माध्यमातून किल्ल्यावर 12 मोहिमा राबवण्यात आल्या असून, मागील सहा मोहिमा या गडावरील टाक्यांच्या साफसफाईसाठी राबवण्यात आल्या आहेत. या मोहिमेत एक तोफ आणि काही अवशेष या टाकीत सापडले असून, स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना यश आले. या मिळालेल्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन योग्य रीतीने केले जाईल आणि यामार्फत किल्ले सूरगडाचा इतिहास प्रखरपणे प्रकाशात येईल, अशी आशा आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष मयूर कापसे यांनी व्यक्त केले. या मोहिमेसाठी तब्बल 31 सुरगडाच्या शिलेदारांनी सहभाग नोंदवला होता.