| उरण | वार्ताहर |
नवी मुंबईतील स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण घोटाळा कर्नाटकच्या खाण घोटाळ्यापेक्षा गंभीर असून,3000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. याशिवाय कंपनीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे.
स्वराज स्टोन एलएलपी कंपनीच्या महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादीतर्फे शुक्रवारी(दि.26) प्रॉक्कझीमा बिल्डिंग (अरुणाचल भवन), वाशी, नवी मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रेशर मालक, दगणखाण चालक यांच्यावर होत असलेला अन्याय आणि महसूल यंत्रणेला हाताशी धरून राज्यमंत्री मंडळातील काही सदस्य तसेच त्यांचे नातेवाईक व्यवसायावर टाच आणत असल्याने या अन्यायाविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रतिनिधी सचिन केणी यांनी आवाज उठविला आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण महसूल क्षेत्रातील बेकायदा दगड खाणी, खनिजकर्म वसूली आणि स्वराज केशर स्टोन एलएलपी कंपनीने शासनाच्या परवानगी शिवाय दर ठरवून एकाधिकारशाहिने सुरु ठेवलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे सुरु असलेल्या हजारो कोटयावधीच्या घोटाळयाबाबत निवृत्त न्यायाधिशांच्या त्रिसदस्यिय कमिटी किंवा राज्याच्या लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच शासनाने जसे रेतीचे दर ठरविले आहेत. रेतीवर जसे नियंत्रण शासनाने ठेवले आहे, तसे नियंत्रण खडी दगडावर ठेऊन त्याचे दर शासनाने ठरवावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे.
या घोटाळयात स्वराज केशर स्टोन मालक सुनील म्हसकर, विराज आचरेकर, दादासाहेब सूर्यवंशी, लक्ष्य गुप्ता यांच्यासह काही मंत्रिगणांचा घोटाळ्यात हात असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.