। उरण । वार्ताहर ।
घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आराखडा तयार करण्यात आला आहे. या मंजूर विकास आराखड्यातील 92.2 कोटी खर्चाच्या कामांना गती देऊन, गळती लागलेल्या धरणाच्या दूरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी, शिवडी-न्हावा सि-लिंग बाधित मच्छिमारांना आर्थिक नुकसान भरपाई आणि बेटावर येणार्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीला बंदर विभागाच्या माध्यमातून स्वागत कक्ष बांधून देणे आदी विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना शनिवारी ( दि 1) आयोजित करण्यात आलेल्या.
घारापुरी बेट जागतिक कीर्तीचे पर्यटन क्षेत्र असल्याने बेटावर येणार्या पर्यटकांना व येथील ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्या बाबत ग्रामपंचायतीकडून पालकमंत्री तटकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, शिष्टमंडळ आणि ग्रामस्थांनी जानेवारी 2022 रोजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन बेटाच्या विकासासाठी विविध शासकीय विभागांनी तयार करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीला तत्काळ गती देण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.
घारापुरी ग्रामपंचायतीच्या मागणीला प्रतिसाद देत तटकरे यांनी बैठक घेऊन भारतीय पुरातत्व विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, एमटीडीसीचे सहाय्यक अभियंता नागरे, उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील,मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, सचिन म्हात्रे, मंगेश आवटे, भरत पाटील, रमेश पाटील, सोमेश्वर भोईर, तसेच आजी-माजी पदाधिकारी व महसुल विभागातील अधिकारी वैजनाथ ठाकूर, भावना घाणेकर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
बेटावरील नागरिकांना पाणी पुरवठा करणार्या धरणाला गळती लागली आहे. जल मिशन योजनेअंतर्गत सदरच्या धरणाच्या दूरुस्तीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी पाच कोटीपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार करण्यात आलेल्या मंजूर विकास आराखड्यातील कामांना गती देऊन विकासकामांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश तटकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.