| पाताळगंगा | प्रतिनिधी |
‘वासुदेव आला हो, वासुदेव आला’ हे गाणे कानावर पडले की पहाटे गाव जागविणारा वासुदेव आठवतो. गळ्यात कवड्या-मण्यांच्या माळा, अंगावर रंगीबेरंगी कपडे, दोन्ही हातात तांब्याचे कडे, हातामध्ये चिपळ्या, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि डोक्यात मोरपिसाची टोपी असा त्याचा पेहराव असायचा. पूर्वी पहाटे तो घरोघरी फिरत असे. आता मात्र वासुदेव लुप्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे दर्शन दुर्मिळच झाले आहे.
ग्रामीण भागात वासुदेवाचे महत्व विशेष होते. परंतु, आता त्याचे मुळात दर्शनच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे ‘वासुदेव आला हो, वासुदेव आला’ हे स्वर कानी पडतच नाहीत. त्यामुळे कृष्णाचा अवतार मानल्या जाणाऱ्या वासुदेवाला संगणक युगात थारा नाही, असे यावरून स्पष्ट होत आहे. वासुदेव केवळ शहरातूनच नव्हे तर खेड्यातूनही हद्दपार झाला आहे. पूर्वी भात कापणी झाली की वासुदेव घरोघरी जाऊन धान्य मागायचा, बच्चे कंपनी वासुदेवाच्या आवाजाने पहाटे उठून त्याच्या मागे फिरायची. ‘सकाळच्या पहारी आली वासुदेवाची स्वारी’ अशी गाणी म्हणत आपल्या दोन्ही हातातील चिपळ्या वाजवत वासुदेव धान्य मागत होते. वासुदेव ही पिढ्यानं पिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. मात्र, ही परंपरा टिकविण्यासाठी सध्या कोणीही धजावत नाही. शहरीकरणात फ्लॅट संस्कृतीमुळे वासुदेवाला इमारतीत प्रवेश मिळत नसल्याने शहरातून तर तो केंव्हाच हद्दपार झाला आहे. मात्र, गावाकडे काही प्रमाणात वासुदेवाचे दर्शन होत असून उत्सुकतेपोटी वासुदेवाला पाहून मान सन्मान दिला जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, आजही भारतीय संस्कृती जोपासली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.







