| खोपोली | प्रतिनिधी |
जमिनीच्या वाटणीच्या वादातून बहिण रोहिणी भगवान पाटील आणि दीपक पांडुरंग पाटील यांनी 55 वर्षीय लक्ष्मण पांडू डुकरे यांना मारहाण केल्याचा आरोप असून, या मारहाणीत लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 19) निगडोली येथे घडलेल्या या घटनेने खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर खालापूर पोलिसांनी आरोपी रोहिणी पाटील आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डुकरे आणि त्यांची बहीण रोहिणी यांच्यात काही दिवसांपासून जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. मे महिन्यातही याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची आणि मारामारी झाली होती. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रोहिणी पाटील आणि दीपक पाटील हे लक्ष्मण यांच्या निगडोली येथील शेतघरावर आले. यावेळी पुन्हा जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले.
रोहिणी आणि दीपक यांनी लक्ष्मण यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. वडिलांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा जयेंद्र मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीत लक्ष्मण यांना गंभीर दुखापत झाली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने चौक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जयेंद्र डुकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोहिणी भगवान पाटील आणि दीपक पांडुरंग पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेसवे आणि औद्योगिक पट्ट्याच्या जवळिकीमुळे खालापूर तालुक्यातील जमिनींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात फार्महाऊसचा वाढता ट्रेंड आणि जमिनीतील गुंतवणुकीमुळे जमिनीची किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील वाटणी आणि मालकीचे वादही अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांत दुसरी धक्कादायक घटनानिगडोली गावात मे महिन्यात 75 वर्षीय रघुनाथ दत्तू फराट आणि त्यांच्या 72 वर्षीय पत्नी सुरेखा फराट यांच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. दोघांची घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरेखा फराट ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे यांच्या आत्या होत्या. या घटनेनंतर आता जमिनीच्या वादातून लक्ष्मण डुकरे यांचा मृत्यू झाल्याने निगडोली पुन्हा हादरले आहे.
जमीन सोन्याची; नाती मात्र रक्ताची!
महामार्ग, औद्योगिक प्रकल्प आणि फार्महाऊसच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागातील जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पूर्वी उपजीविकेचे साधन असलेली जमीन आता मोठ्या आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू बनली आहे. मात्र, जमिनीच्या वाटणीसाठी रक्ताच्या नात्यातच संघर्ष पेटून त्याचा शेवट जीवावर बेतत असेल, तर वाढत्या जमिनीच्या किमतींसोबत नात्यांची किंमतही तपासण्याची वेळ आली आहे.
दीपक पाटील कोण?
बहीण-भावाच्या जमिनीच्या वादात दीपक पाटील याचा नेमका संबंध काय? निगडोलीतील लक्ष्मण डुकरे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांची बहीण रोहिणी भगवान पाटील यांच्यासह दीपक पांडुरंग पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, बहीण आणि भावामधील जमिनीच्या वाटणीच्या वादात दीपक पाटील याचा नेमका संबंध काय होता, तो घटनास्थळी का आला होता आणि मारहाणीमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.







