| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील एच.ओ.सी. रसायनी येथे नुकत्याच रायगड जिल्हा क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मुरुड तालुक्यामधील काळघर येथील पी.एन.पी. माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्पर्धेत उत्तम यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत काळघार पी.एन.पी. माध्यमिक विद्यालयाने 14 वर्षांखालील मुलींच्या 400 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर, अनुष्का महाडिक हिने उंच उडीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर 17 वर्षांखालील मुलींमध्ये 200 मीटर धावण्यात आर्या पवार तृतीय, तर उंच उडीमध्ये अंतरा गौतडे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, काही विद्यार्थिनींनी विना शूज धावतही अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याने त्यांच्या जिद्दीचे व क्रीडाकौशल्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील, शाळेचे चेअरमन संतोष कांबळी, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती, सुरेश नांदगावकर, सिताराम ठाकूर, मुख्याध्यापक मनोज सुर्वे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







