नवी दिल्ली 

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाने जागतिक कमोडिटी बाजारात मोठी उलथापालथ सुरु आहे.मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोने मागणीत प्रचंड वाढ झाली असून जागतिक कमोडिटी बाजारात सोने दर सात वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे.

 शेअर बाजारात नफा वसुली करून गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 852 रुपयांनी वधारून 40 हजार 964 रुपयांवर गेला आहे. सकाळच्या सत्रात सोने 41 हजार 96 रुपयांपर्यंत वाढले होते. मागील दोन सत्रात सोने 1800 रुपयांनी महागले आहे.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारात घसरण होत असून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. इराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हा अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. या वृत्तानंतर जगभरातील कमोडिटी आणि शेअर बाजारांवर पडसाद उमटले.

 मागील दोन सत्रात कमोडिटी बाजारात सोने 1800 रुपयांनी महागले आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदीच्या बेतात असणार्‍या ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. जागतिक आणि देशांतर्गत अस्थिरतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत तब्बल 140 अंकांची पडझड झाली. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात 31 पैशांचे अवमूल्यन झाले. तो 72. 11 वर व्यवहार करत आहेत.

 

अवश्य वाचा