मुंबई 

जिल्हा परिषदेनंतर आता पालिका पोटनिवडणुकींमध्येही भाजपची दाणादाण उडाली आहे. सहा महापालिकेतल्या सात जागांपैकी चार जागा आघाडीने जिंकल्या तर भारतीय जनता पार्टीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा जनता दल सेक्युलरने जिंकली. मुंबई, नाशिक, मालेगाव आणि लातूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर पनवेल आणि नागपूर पालिका पोटनिवडणुकीत भाजपला यश आले

 मुंबई महापालिकेच्या मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला. महापालिका प्रभाग क्रमांक 141 पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला. यामुळे शिवसेनेच्या संख्याबळात एकने वाढ होऊन 96 झाली आहे. 2017 मध्ये लोकरे या विभागात काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेतून लढवली. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पोटनिवणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती.

नाशिक महापालिकेच्या प्रभाग 22 आणि 26 च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादीचे जगदीश पवार तर प्रभाग 26 मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले.  या निकालामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसून आलं.

नागपूर पालिका पोट निवडणुकीत भाजपाचं कमळ फुललं आहे. भाजपाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. काँग्रेसचे पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालं. विक्रम ग्वालबंशी यांनी 13 हजार 386 हजार मतांनी विजय मिळवला.

 मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र 12 ड साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत जनता दल एमआयएम महाआघाडीचे मुस्तकीम डिग्नेटींनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मुस्तकीम यांना 7992 मते मिळाली तर काँग्रेसच्या फारूक कुरेशींना 510 तर अपक्ष इम्रान अन्सारींना 815 मते मिळाली.

2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता दल शहराध्यक्ष बुलंद इकबाल हे विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं आकस्मित निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. जनता दलाचे मुस्तकीम यांच्या रूपाने आपली जागा राखण्यास यश मिळवले आहे. बुलंद इकबाल यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करून महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे विजयी झालेले मुस्तकीम डिग्नेटि यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा