जळगाव 

 भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीतच भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण झाली. तर, रावसाहेब दानवे व माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. भाजपमधील दोन्ही गटांनी व्यासपीठासमोरच हाणामारी केली. या गोंधळात महाजन व दानवे यांच्यावर शाई उडाली.

भुसावळ शहराध्यक्ष निवडीत हा वाद झाला. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार होती. यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भुसावळ येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भुसावळ तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या या गटाने रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्याची विनंती केली.

नेत्यांनी निवेदन स्वीकारण्यास अनुमती दिल्यानंतर काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी भुसावळ येथील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्ते आपआपसात भिडले. या गोंधळातच काही अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट सुनील नेवे यांच्यासह रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या दिशेने शाई फेकली. या गोंधळात भाजपातील एका पदाधिकार्‍याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. या गोंधळामुळे बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. सुनील नेवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक समजले जातात

अवश्य वाचा