औंध (पुणे) 

पाषाण सुतारवाडी येथे दोन  नवजात बालके उघड्यावर सोडून  जन्मदात्याने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.  प्राथमिक माहितीनुसार, एकाच दिवसाची ही दोन्ही बालके आहेत. महामार्गालगतच्या कचर्‍यामध्ये ही मुले सापडली आहेत. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही जिवंत असून, दोघांनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळच्या वेळी शहनावाज शेख हे जॉगिंगसाठी निघाले असताना त्यांना एका ठिकाणी कुत्री भुंकत असल्याचा आवाज  आला. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता नवजात बालके रडत असल्याचे दिसले. त्यानंतर अर्भकांवरील कापड उघडून पाहिले तेव्हा दोन बालके दिसली. त्यांनी याची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. घटनेची  माहिती  मिळताच चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या वेळी ही मुले उघड्यावर टाकून आई-वडिलांनी पळ काढला असण्याची शक्यता आहे. ही मुले कोणाची आहेत याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

महामार्गालगत सर्व्हिस रोडजवळ ही मुले सापडली आहेत. ही दोन्ही मुले पहाटे चार-पाच वाजता ठेवण्यात आल्याचे लक्षात येत आहे. लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलवले आहे.  याआधीही या ठिकाणी अशा घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

 

अवश्य वाचा