पालघर 

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे समुद्री जिवांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. वसईतील किनारे प्रदूषित झालेले आहेत, मात्र आता प्रदूषणाचा फटका मासेमारीलाही बसू लागला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात आता मासळीपेक्षा कचराच जास्त येऊ लागला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, हा प्रकार भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.

समुद्रकिनारी असलेल्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. या भागातील शेकडो मच्छिमार या व्यवसायावर आपली उपजीविका करत आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून वसईतील मच्छिमारांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या आहे समुद्रात वाढत जाणार्‍या कचर्‍याची. वेगवेगळ्या कारणांमुळे समुद्रात कचरा आणि सांडपाणी टाकले जात असल्याने समुद्र प्रदूषीत होत आहे. हा वाढता कचरा मच्छिमारांसाठी केवळ डोकेदुखीच बनलेला नाही, तर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत देत आहे. दिवसेंदिवस या कचर्‍याचे प्रमाण वाढू लागल्याने समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणार्‍या मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात कचरा अधिक प्रमाणात दिसून आला आहे. या कचर्‍यात जास्त प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या व खाद्यपाकिटे आढळून येत आहेत. यापूर्वी फक्त किनार्‍यावर कचरा आढळत होता. आता खोल समुद्रातही कचरा आढळू लागल्याचे मच्छिमारांनी सांगितले.

खाडीच्या पात्रात व समुद्रात काहीजण सर्रास कचरा टाकून देत आहे. आजही किनार्‍यावर येणार्‍या काही पर्यटकांकडून कचरा समुद्रात टाकला जात असतो. तर काहीजण चालत्या लोकल गाडीतूनही निर्माल्याच्या नावाखाली इतर कचरा पाण्यात फेकून देतात. वसई परिसरात नायगाव, आचोले, नालासोपारा, भाईंदर, वैतरणा, घोडबंदर अशा छोट्या-मोठ्या खाड्या आहेत. या खाड्यांच्या पात्रातही कचरा टाकला जातो हा कचरा समुद्राला आलेल्या भरतीमुळे थेट समुद्राला येऊन मिसळतो.

दैनंदिन मासेमारी करण्यासाठी जाणार्‍या मच्छिमारांच्या जाळ्यात मासे कमी व कचरा जास्त अडकून येत असल्याने माशांची आवक कमी झाली असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. सुरुवातीला ज्या भागात जास्त प्रमाणात मासळी मिळत होती, त्या भागात दिवसभर थांबूनही मासळी मिळत नसल्याने दैनंदिन रोजगारावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.

अवश्य वाचा