इस्रोने गगनयान मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रो मानवाला अंतराळात पाठवणार आहे. चांद्रयान, मंगळयान अशा मोहिमा यशस्वीपणे राबवणार्‍या इस्रोला आता मानवाला अंतराळात पाठवण्याचे वेध लागले आहेत. दरम्यान, गगनयान मोहिमेआधी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. मानवविरहित यानं अंतराळात पाठवण्यात येणार आहेत. या यानांमधून व्योममित्र हा रोबो अंतराळात भरारी घेणार आहे. 

इस्रोने आजवर अनेक मोहिमा राबवल्या. चंद्रावर, मंगळावर यानं पाठवली. अनेक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरस्थावर केले. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल केलं. भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. यशाची एक, एक पायरी चढत असताना इस्रोला एक सल बोचत होती. भारताने अजूनही मानवाला अंतराळात पाठवलेलं नाही. ही उरलीसुरली कसर भरून काढण्यासाठी इस्रो सज्ज झाली आहे. 2022 मध्ये इस्रो ङ्गगगनयानफ मोहिम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत मानवाला अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी, त्यात कोणतीही चूक होऊ नये यासाठी इस्रोने जय्यत तयारी सुरू केली आहे. या गगनयान मोहिमेचा एक भाग असेल तो ङ्गव्योममित्रफ हा रोबो. इस्रोतर्फे या व्योममित्रचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. व्योम म्हणजे अंतराळ. म्हणूनच अंतराळाचा मित्र तो व्योममित्र. व्योममित्र हा अर्धाकृती मानवी रोबो आहे. त्याला महिलेचं रुप देण्यात आलं आहे.  इस्रो गगनयान मोहिमेआधी काही चाचण्या घेणार आहे. या अंतर्गत दोन मानवरहित यानं अवकाशात पाठवण्यात येतील. हा व्योममित्र या दोन्ही मोहिमांमध्ये सहभागी होणार आहे.  व्योममित्रला पाय नाहीत. तो मानवाप्रमाणे विविध कृती आणि क्रिया करू शकतो. तो बोलू शकतो, माणसांना ओळखू शकतो. व्योममित्र संवाद साधू शकतो, चर्चा करू शकतो आणि प्रश्‍नांची उत्तरंही देऊ शकतो. अशा या व्योममित्रविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्योममित्र हा मानवी रोबो इस्रोनेच विकसित केला आहे. तो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये संवाद साधतो. व्योममित्रने उद्घाटनप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. व्योममित्र दोन्ही बाजूंना आणि पुढे झुकू शकतो. व्योममित्रच्या मदतीने इस्रो काही प्रयोग करणार आहेत. तसंच हा रोबो इस्रोच्या मुख्य केंद्राच्या सतत संपर्कात असेल. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 2020 च्या डिसेंबरमध्ये भारताचं मानवविरहित यान अंतराळात झेपावेल. त्यानंतर जून 2021 मध्ये इस्रो दुसरं यान अंतराळात पाठवेल. या दोन्ही यानांमध्ये व्योममित्र असेल. व्योममित्रच्या अंतराळातल्या प्रत्येक कृतीकडे इस्रोचं लक्ष असेल. मानवी रोबो इतर रोबोंप्रमाणेच संगणकीय प्रणालीशी जोडलेला असतो. या संगणकीय प्रणालीनुसारच त्याच्या हालचाली होतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे विविध कामांसाठी मानवी रोबोचा वापर करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. स्वयंचलित गाड्या, अ‍ॅलेक्सा, सिरी, गूगल असिस्टंट, कॉर्टाना आणि बिक्स बायसारखं तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावरच विकसित करण्यात आलं आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे मानवी रोबो. चालणं, वस्तू उचलून ठेवणं, संवाद साधणं आणि आज्ञांचं पालन करणं या कामांसाठी मानवी रोबोंचा विकास केला जातो.

अमेरिका, रशियासारख्या देशांनी मानवाला अंतराळात पाठवलं. मात्र या मोहिमा राबवण्याआधी या देशांनीही चाचण्या घेतल्या. अंतराळवीरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. या चाचण्या यशस्वी ठरल्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जातं. इतर देशांनी मानवी मोहीम राबवण्याआधी प्राण्यांना अंतराळात पाठवलं. मात्र भारत मानवी रोबोद्वारे ही चाचणी घेणार आहे. इस्रो दोन मानवरहित मोहिमांच्या मदतीने आपल्या जीएसएलव्ही एमके 3 या रॉकेटची क्षमता तपासून पाहणार आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातल्या रोबोटिक्स प्रयोगशाळेत व्योममित्रची निर्मिती करण्यात आली आहे. आता हा व्योममित्र अंतराळात नेमकं काय करणार, त्याच्या मदतीने ही मोहीम कशी यशस्वी होणार असे प्रश्‍न पडणं अगदी स्वाभाविक आहे. 2014 मध्ये ङ्गइंटरस्टेलरफ नावाचा एक चित्रपट आला होता. अंतराळ, काल प्रवास अशा विषयांवर आधारित असणार्‍या या चित्रपटात टीएआरएस नावाची प्रमुख व्यक्तिरेखा होती. टीएआरएस ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानने युक्त संगणकीय प्रणाली होती. ही प्रणाली अंतराळवीरांशी संवाद साधायची, मोहिमेच्या विविध कामांमध्ये त्यांना मदत करायची तसंच  संकटकाळात त्यांच्या बचावाचं कामही करायची. टीएआरएस हा मानवी रोबो नव्हता. मात्र त्याच्यात प्रचंड क्षमता होती. टीएआरएस हा विज्ञानाचा एक चमत्कारच होता. या चित्रपटाचं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे व्योममित्रही कामही साधारणपणे अशाच प्रकारचं असेल.

व्योममित्र हे टीएआरएस प्रकारचं, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं अत्यंत प्राथमिक स्वरुपाचं यंत्र आहे. अंतराळात गेल्यावर अंतराळवीर जी कामं करतील तिच कामं व्योममित्र करेल. तो सुरक्षेची काळजी घेईल, मुख्य केंद्राकडून येणार्‍या सूचना स्वीकारेल, या सूचनांचं पालन करून त्यानुसार कामं करेल. आसपासच्या वातावरणाला प्रतिसाद देईल, त्याची सूचना मुख्य केंद्राला देईल, कार्बन डाय ऑक्साइड कॅनिस्टर्सची अदलाबदली करेल, बोलून प्रतिसाद देईल. व्योममित्रच्या कामाची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे अंतराळात जाताना त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. व्योममित्र ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. अंतराळात जाताना आणि पृथ्वीवर परतताना क्रू मॉड्यूलमध्ये होणार्‍या बदलांची माहितीही तो मुख्य केंद्रापर्यंत पोहोचवेल. अंतराळयानातल्या उष्णता उत्सर्जनाच्या पातळीची माहिती व्योममित्रकडून घेता येईल. यामुळे मानवी मोहिमेच्या सुरक्षेसाठी क्रू मॉड्यूलमध्ये लागणार्‍या उष्णतेच्या उत्सर्जनाची पातळी नेमकी किती असायला हवी, हे इस्रोला कळू शकेल. त्यामुळे व्योममित्रवर बरंच काही अवलंबून असेल.

याआधीही विविध अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळवीरांच्या प्रतिकृती पाठवण्यात आल्या आहेत. व्योममित्रसारखे मानवी रोबोही अनेकदा पाठवण्यात आले आहेत. मार्च 2019 मध्ये अंतराळवीराची अशीच प्रतिकृती अंतराळात पाठवण्यात आली होती. रिप्ली नावाचा डुप्लिकेट अंतराळवीर स्पेस एक्स फाल्कॉन रॉकेटमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आला होता.  2020 मध्ये स्पेस एक्सच्या माध्यमातून नासा  मानवाला अंतराळात पाठवणार आहे. रिप्लीवर  सेन्सर्स बसवण्यात आले होते. या सेन्सर्सद्वारे नासाला आवश्यक असणारी माहिती मिळवता आली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित किमॉन नावाचा रोबो बॉलही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आला होता. किमॉन हा तरंगणारा कॅमेरा रोबो होता. जाक्सा अंतराळ संस्थेतर्फे त्याला स्थानकावर पाठवण्यात आलं होतं. जपानमध्ये तयार करण्यात आलेला किरोबो नावाचा मानवी रोबो अंतराळवीरही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेला होता. या स्थानकाचा पहिला जपानी कमांडर कोईची वाकातासोबत किरोबो गेला होता. या स्थानकावर करण्यात येणार्‍या प्रयोगांदरम्यान कोईची वाकाताला सहाय्य करण्यासाठी किरोबोला पाठवण्यात आलं होतं. चेहरा ओळखणं, आवाज ओळखणं, टेलिकम्युनिकेशन अशी विविध कौशल्यं किरोबोला अवगत होती. रशियानेही फेडॉर नावाचा मानवी रोबो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवला होता. त्यानंतर आता भारतीय बनावटीचा व्योममित्र अंतराळात झेपावणार आहे. या व्योममित्रच्या कामगिरीकडे आणि इस्रोच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेकडे सर्वांचं लक्ष असेल. गगनयान मोहिमेमुळे इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार हे नक्की!

अशी असेल गगनयानफ मोहीम

राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. ते रशियन अंतराळयानातून अंतराळात गेले होते. पण ङ्गगगनयानफ मोहिमेअंतर्गत तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे. भारतीय रॉकेटने सोडलेल्या भारतीय अंतराळयानातून हे अंतराळवीर आकाशात झेपावणार आहेत. त्यामुळे ही मोहीम पूर्णपणे वेगळी असेल. गगनयान मोहिमेसाठी भारतीय वायूदलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. या अंतराळवीरांना भारतासह रशियामध्ये प्रशिक्षण घ्यावं लागेल. दुसरीकडे, भारतीय वायूदलातल्या काही डॉक्टर्सना फ्रान्सला पाठवण्यात येणार आहे. अंतराळात जाणार्‍या भारतीय अंतराळवीराच्या आरोग्य तपासणीचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल. त्यानंतर हे डॉक्टर्स या अंतराळवीरांची देखभाल करतील. मानवी रोबो व्योममित्र दोन्ही मानवरहीत मोहिमांमध्ये सहभागी होणार असला तरी मुख्य मोहिमेत त्याचा सहभाग असणार किंवा नाही हे अजूनही उघड झालेलं नाही.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार