नवी-दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचीही तयारी पक्षाने केली आहे. रविवार 16 फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांचा नव्या मंत्रिमंडळासह शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.

2015 प्रमाणेच यंदाही दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवाल सरकारचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. दिल्लीत सलग तिसर्‍यांदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. केजरीवाल यांनी आज सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शपथविधीची तारीख आणि संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

केजरीवाल आपल्या शपथविधीला नेमकं कोणकोणत्या राजकीय नेत्यांना निमंत्रण देणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेऊन केजरीवाल शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे. याशिवाय, इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही शपथविधीचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचं समजतं.

केजरीवाल यांच्या ’आम आदमी’ यंदाच्या निवडणुकीतही अगदी सहजपणे बहुमताचा आकडा पार करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दिल्लीच्या एकूण 70 पैकी 62 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार