मुंबई   

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी खूशखबर आहे. 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही 5 दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना 6 दिवसांच्या आठवड्याऐवजी 5 दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला 6 दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितलं जातं.

पाच दिवसांचा आठवडा केल्यास सरकारी कार्यालयाच्या वेळांमध्ये वाढ करावी लागणार आहे. 10 वाजता सुरू होणारी कार्यालये सकाळी 9 वाजता सुरू करावी लागणार असून, सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ वाढवावी लागणार आहे. दिवसभरात 8 तासांपेक्षा जास्त काम करण्याची मानसिकता सध्याच्या घडीला सरकारी कर्मचार्‍यांची नसताना, कार्यालयीन वेळ वाढवून कामकाजाचा निपटारा कसा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी आग्रही होते, असं सूत्रांचं म्हणणं होतं. सर्वच सरकारी कर्मचार्‍यांच्या संघटनांनी यासंदर्भात त्यांच्याकडे निवेदनं दिली होती. पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी या संघटनांनी केली होती. अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

अवश्य वाचा