मुंबई  

अनुसूचित जाती जमातींना घटनेने दिलेले आरक्षण मोडीत काढण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या केंद्रातील सत्ताधारी भाजपचा मनसुबा असल्याचा आरोप करून, केंद्रातील भाजपच्या सरकारचा हा कुटील डाव काँग्रेस हाणून पाडेल. वंचित समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिला. भाजपच्या धोरणाविरुद्ध राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात मभाजपला हटवा, आरक्षण वाचवाफ, आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, युवक कल्याण मंत्री सुनील केदार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

उत्तराखंडमधील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी मिळून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना घटनेने दिलेल्या आरक्षणाचा मूलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप थोरात यांनी केला. अनुसूचित जाती, जमातींना नोकरीत आरक्षण देणे ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी नाही, असे उत्तराखंड भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून सरकारी नोकरीत आरक्षण द्यायचे की नाही, हे सरकारवर अवलंबून आहे, असे म्हटले आहे. हा प्रकार आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वारंवार आरक्षणावर पुनर्विचार करण्याची आणि आरक्षण संपवण्याची मागणी केली आहे. त्याच दृष्टीने केंद्र आणि विविध राज्यातील भाजप सरकारे काम करीत असून, हे अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

 

अवश्य वाचा