मुंबई  

बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज 19-25, 25-20, 25-14 अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली. तसेच प्रशांत मोरे, अनिल चोरगे व सेजल लोखंडे यांनीसुद्धा  आगेकूच केली आहे. 

दुसर्‍या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात विजय कॅरम क्लबच्या संजय कांबळेने डी. के. सी. सी. च्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सार्थक नागावकरची 25-4, 11-25,25-11 असा कडवा प्रतिकार मोडीत काढला. आर्युविमा महामंडळाच्या अनिल चोरगेने संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत 9-25, 25-18, 25-18 असा सचिवालय जिमखान्याच्या संजय वारंगवर विजय मिळवित स्पर्धेतला तिसरा ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे. राष्ट्रीय विश्‍व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने सरळ दोन गेममध्ये वालपखाडी क्लबच्या हिंमत राठोडचा 25- 18, 25-9 असा फाडशा पाडत विजयी कूच केली. ए. के. फाऊंडेशनच्या अमन जैनने तीन गेम रंगलेल्या लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दत्ता विनेरकरवर 25-1, 11-25, 25-0 असा विजय मिळवित चौथी फेरी गाठली.  

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सेजल लोखंडेने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अनुभवी वैभवी शेवाळेचा 25-12, 25-11 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करताना पहिल्या गेममध्ये ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. दुसर्‍या एका सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या रोझिना गोडॅडने एस. एस. ग्रुपच्या मानसी शिंदेचा तीन गेम रंगलेल्या

अटीतटीच्या लढतीत 25-16, 9-25, 25-4 अशी कडवी झुंज मोडीत काढून आगेकूच केली. या स्पर्धेत आतापर्यंत 4 ब्रेक टू फिनिश आणि 3 ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा यशस्वी करण्याकरिता बॉम्बे वाय. एम. सी. ए.. चे जेसन सैम्युल, कार्याध्यक्ष पिटर सेबॅस्टियन-प्रोग्राम कमिटी चेअरमन, पॉल जॉर्ज-सरचिटणीस आणि भास्कर कुमार-चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपिस्ट संजय बेलनेकर, गणेश प्रजापती, ओसामा चौधरी, जाहीर जायवाला, नदीम आणि त्यांचे सहकारी मेहनत घेत आहेत.

अवश्य वाचा