मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक असणार्‍या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नोवाक जोकोविकने आठव्यांदा नाव कोरलं. ग्रँड स्लॅममध्ये पुरुष एकेरीची विजेतेपदं जोकोविक, नदाल आणि फेडरर या त्रिकुटाभोवती फिरत असताना महिला एकेरीला नेहमीच नवी विजेती मिळत असल्याचं चित्र दिसून येतं. यंदा अमेरिकेच्या सोफिया केनिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं तर भारताच्या पदरी अपयशच पडलं. 

ऑस्ट्रेलियन ओपन असो किंवा टेनिसमधली दुसरी कोणतीही ग्रँडस्लॅम स्पर्धा, विजेतेपद नोवाक जोकोविक, राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर या त्रिकुटापैकी कोणा एकाच्या पदरी पडतंय. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात टेनिसमधल्या या तीन दादा खेळाडूंपैकी एकाच्या हातात झळाझता विजयी चषक असतो तर तुलनेने अननुभवी किंवा युवा खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागतं. ग्रँड स्लॅम स्पर्धेचा एक एक टप्पा पार करत अंतिम फेरीत पोहोचणार्‍या खेळाडूसमोर या तिघांपैकी एकाचं आव्हान असतं. हे खेळाडू नदाल, फेडरर किंवा जोकोविकला चांगलाच घाम गाळायला लावतात. जबरदस्त टक्कर देतात. पण अखेरीस अनुभवच वरचढ ठरतो ह दिसून येतं. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्येही हेच चित्र पहायला मिळालं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थियमसमोर सर्बियाच्या द ग्रेट नोवाक जोकोविकचं आव्हान होतं. थियमने जोकोविकला चांगलंच झुंझवलं. हा सामना पाचव्या सेटपर्यंत रंगला. पण जोकोविकने थियमला 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 असं नमवलं. थियमने याआधी उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालवर मात केली होती तर जोकोविकने उपांत्य सामन्यात सार्वकालिन महान टेनिसपटूंपैकी एक असणार्‍या रॉजरर फेडररवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे दोन महान खेळाडूंमधला अंतिम सामना बघण्याची प्रेक्षकांची संधी हुकली खरी. पण थियमनेही जोकोविकला सहज विजय मिळू दिला नाही. असं असलं तरी जोकोविकला नमवून टेनिसविश्‍वाला हादरवून टाकण्याची संधी त्याला काही साधता आली नाही.

गेल्या जवळपास दीड दशकांपासून   पुरुष एकेरीत फेडरर, नदाल आणि जोकोविकचं राज्य आहे. त्यांची सद्दी मोडून काढण्याची क्षमता सध्या तरी कोणत्याही टेनिसपटूमध्ये दिसत नाही. फेडरर, जोकोविक आणि नदाल यांच्यात जोकोविकच सर्वात लहान आहे. तो 32 वर्षांचा आहे. नदाल 33 तर फेडरर 38 वर्षांचा आहे. तो आता नदाल आणि फेडररला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. जोकोविकने गेल्या सात महत्त्वाच्या स्पर्धांपैकी पाच स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. फेडररने ग्रँडस्लॅम स्पर्धांची 20 विजेतेपदं पटकावली आहेत. नदालकडे 19 विजेतेपदं असून जोकोविकने नुकतीच 17 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ही चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी वर्षातली पहिलीच स्पर्धा. त्यामुळे उर्वरित स्पर्धांची विजेतेपदं कोण पटकावणार, याकडे टेनिसविश्‍वाचं लक्ष लागून राहिलं आहे. रॉजर फेडररच्या नावे असणारा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम नदाल आणि जोकोविक यांच्यापैकी कोण मोडणार याबाबत टेनिसविश्‍वात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच रॉजर फेडरर आघाडी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नोवाक जोकोविकचा खेळ पाहता हा पठ्ठया बाजी मारून जाईल, असंच वाटून जातं.

फेडरर, नदाल यांच्याशी भिडणारा जोकोविक वेगळाच भासतो. या दोघांच्या खेळाची शैली, बारकावे त्याला माहीत असतात. म्हणूनच 2014 नंतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जोकोविकला नमवणं या दोन महान खेळाडूंना शक्य झालेलं नाही. मात्र थियमसारख्या युवा खेळाडूशी दोन हात करताना जोकोविक काहीसा अस्वस्थ भासतो. तो गडबडून जातो. टेनिस क्रमवारीतल्या पहिल्या तीन क्रमांकांवर जाकोविक, नदाल आणि फेडरर आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा चालवण्यासाठी भावी पिढीने सज्ज होणं गरजेचं आहे. टेनिस कोर्टवर चांगली कामगिरी करणार्‍या काही युवा खेळाडूंपैकी थियम या तिघांचा वारसा चालवू शकतो. गेल्या वर्षी थियमने फेडररचा तीन सामन्यांमध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदालला नमवलं, जोकोविकला भिडला. त्याने जोकोविकला नमवलंही आहे. त्यामुळे भावी पिढीतला सर्वोत्तम खेळाडू बनण्याची क्षमता थियममध्ये असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत थियम चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे येत्या काळात थियम या बिग थ्रीपैकी एकाची जागा घेऊ शकतो.

दरम्यान, रॉजर फेडररने 2003 मध्ये आपलं पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आजवर 67 ग्रँड स्लॅम स्पर्धा पार पडल्या आहेत. यापैकी फक्त 11 स्पर्धांमध्ये टेनिसला या तिघांव्यतिरिक्त दुसरा विजेता मिळाला. 56 ग्रँड स्लॅम स्पर्धांची विजेतेपदं या तीन खेळाडूंनीच पटकावली आहेत. म्हणजे 81 टक्के ग्रँड स्लॅमवर या तिघांनी वर्चस्व गाजवलं आहे. गेल्या 13 ग्रँड स्लॅम स्पर्धांबद्दल बोलायचं तर या सर्व स्पर्धा या तिघांपैकी एकाने जिंकल्या आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये या तिघांव्यक्तिरिक्त ब्रिटनचा अँडी मरे, क्रोएशियाचा मालिन सिलिच आणि  स्वीत्झर्लंडचा स्टॅन वावरिंका यांनी ग्रँड स्लॅम  विजेतेपदं पटकावली आहेत. म्हणूनच टेनिसमधल्या या मातब्बर खेळाडूंना आव्हान देण्यासाठी इतर पुरुष खेळाडूंना बरीच मेहनत घ्यावी लागणार हे नक्की!

तिकडे ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद अमेरिकेच्या सोफिया केनिनने पटकावलं. या स्पर्धेत सेरेना आणि व्हिनस विल्यम्स या तगड्या खेळाडूंना पराभूत व्हावं लागलं. पुरुष एकेरीत जोकोविक, नदाल आणि फेडरर यांचं वर्चस्व असलं तरी महिला एकेरीत अशी परिस्थिती दिसत नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिल्या दहा मानांकित  महिला खेळाडू तिसर्‍या फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे 2009 च्या विम्बल्डननंतर असं पहिल्यांदाच घडत होतं. मात्र या दहा सर्वोत्तम खेळाडूंपैकी सहा खेळाडूंना तिसर्‍या फेरीत हार पत्करावी लागली. यापैकी काही खेळाडू तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या दावेदार होत्या. सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका आणि कॅरोलिन वॉझनिअ‍ॅकी या खेळाडूंना तिसर्‍या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आणि ऑस्ट्रेलियन ओपनला सोफिया केनिनच्या रुपात नवी विजेती मिळाली. गेल्या बारा ग्रँड स्लॅम स्पर्धांबद्दल बोलायचं तर आठ वेळा पहिल्यांदा अंतिम सामना खेळणार्‍या महिला खेळाडूला विजेतेपद मिळालं आहे. गेल्या पाच ग्रँड स्लॅम स्पर्धांचं विजेतेपद पाच वेगवेगळ्या खेळाडूंना मिळालं आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सचा दबदबा असला तरी अनेक युवा खेळाडूही आपली ओळख निर्माण करत आहेत आणि ही जमेची बाजू आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारताच्या हाती फारसं काही लागलं नाही. त्यामुळे भारतीय टेनिसपटूंना प्रथम फेरी पार करून पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे, असं जाणवतं.

 युवा ब्रिगेड विश्‍वविजयासाठी सज्ज!

भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाने आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे अवघ्या क्रिकेटविश्‍वाला हादरवून सोडलं असताना भारताचा एकोणीस वर्षांखालचा क्रिकेट संघही विश्‍वचषक स्पर्धेत सरस कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या संघांचं आव्हान मोडित काढत भारताची ही युवा ब्रिगेड एकोणीस वर्षांखालच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाने या विश्‍वचषकावर नाव कोरलं होतं. आता यशस्वी जयस्वालचा संघ विश्‍वविजयी कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाला आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवत भारत विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पाचवा विश्‍वचषक विजय अगदी दृष्टिपथात आला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातला विजय हा भारताचा अंडर 19 विश्‍वचषकातला पाकिस्तानवर मिळवलेला सलग चौथा विजय ठरला. उपांत्य फेरीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे एकोणीस वर्षांखालच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात उपांत्यपूर्व किंवा उपांत्य सामन्यात आजवर कोणत्याही संघाने दहा गडी राखून विजय मिळवला नव्हता. टीम इंडियाने ही कामगिरी करून दाखवली. भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत प्रत्येक बाबतीत उजवा असल्याचं दिसून आलं. म्हणूनच शोएब अख्तरनेही भारताच्या या युवा संघाचं कौतुक केलं आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य सुरक्षित असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यातही यशस्वी जयस्वालचं विशेष कौतुक करायला हवं. संघर्षमय आयुष्य जगणार्‍या यशस्वीने विश्‍वचषकातल्या पाच सामन्यांमध्ये 156 च्या सरासरीने 312 धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावलं. एके काळी पाणीपुरी विकणारा यशस्वी युवा विश्‍वचषकातला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे आता भारतीय संघ शेवटचा अडथळा पार करून या विश्‍वचषकावर पाचव्यांदा नाव कोरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. भारतीय संघाची या स्पर्धेतली कामगिरी बघता यात अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या हातात झळाळता विश्‍वचषक बघायला सर्वजण उत्सुक आहेत.

अवश्य वाचा