पेण 

पेण शहराचा नगरविकास आराखडा ज्या अधिकार्‍यांनी तयार केला त्या अधिकार्‍यांना ऐतिहासीक ठेव्याची माहितीच नसल्याने पेणच्या कापूर बागेचा इतिहास विस्मृतीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

विकास आराखडा तयार करणार्‍या अधिकारांच्या चुकांमुळे कित्येक कुटुंबांना बेघर व्हावे लागणार आहे. त्यातीलच एक म्हणजे कापूर बागेतील साठे कुटुंब. कापूर बाग हा पेणकरांचा ऐतिहासिक ठेवा आहे. 30 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीच्या सांगण्यावरुन मिठाचा सत्याग्रह झाला तो मिठाचा सत्याग्रह याच कापूर बागेतून त्यावेळी झाला. कापूर बागेच्या आब्राराहीमध्ये हजारो सत्याग्रही एकत्र आले होते. खाडीचे खारे पाणी चुलीवरच्या कढईत टाकूण मिठ तयार करुन कायदेभंग करण्यात आला होता. मनमक का कायदा तोड दियाफ या गगनभेदी घोषणादेखील याच कापूर बागेमध्ये झाल्या होत्या. त्यापूर्वी शिवकालीन इतिहासाचा विचार केल्यास याच कापूर बागेच्या परिसरामध्ये मोठया प्रमाणात जहाज बांधणीचा व्यवसाय चालत असे. पेशवाईत याच परिसरात रामोशी व इंग्रजानमध्ये लढाई झाल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु पेणचा नगरविकास आराखडा तयार करताना अधिकार्‍यांनी कापूर बागाच्या माध्यातून 24 मिटर रुंदीचा रस्ता आरक्षित केला आहे. या रस्त्याच्या आरक्षणामुळे आरविंद साठे, आनंद साठे, प्रभाकर साठे, विनायक साठे आणि मंदार साठे यांची घरे बाधित होणार आहेत.

साठे यांच्या आधीच्या पिढीने कापूर बाग सांभाळला त्या कापूर बागाची वाताहात होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी पेण नगरपालीकेमध्ये शहरातील आरक्षित रस्त्यामध्ये बाधित होणार्‍या शेतकरांना विचार विनीमय करण्यासाठी बोलविले होते. परंतु ज्या शेतकर्‍यांना बोलवले होते त्यांना पेण नगरपालीकेकडून आपमानास्पद वागणूक देण्यात आली. शेतकर्‍यांचे काहीच घेण्यात आले नाही. कापूर बाग संर्दभात साठे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडून पेण शहराला 24 मिटर रुंदीच्या रस्त्याची गरज काय, तसेच गरज असेल तर कापूर बागेच्या बाजुने जुनी गवन (रस्ता) येथून रस्ता तयार करावा, अशी सूचना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

डॉ. आनंद साठे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कापूर बाग हे पेणचे फुफ्फुस आहे. कापूर बागामध्ये पाच ते साडेपाच हजार औषधी वनस्पती आहेत. तीनशेपेक्षा अधिक हापूस आंब्याची झाडं आहेत. नगर विकास आराखडयात जो रस्ता आरक्षित केला आहे, तो रस्ता बागेच्यामधून जाऊन 9 एकर जागेपैकी 2 एकर जागा व्यापणार आहे. यामुळे आंब्यासह वनौषधीची हजारो झाडे समूळ नष्ट होणार आहेत. येथील गोशाळा व घरालासुद्धा रस्त्याच्या कामामुळे बाधा येणार आहे. विकासाला विरोध करणार नाही, मात्र पर्यावरणासह ऐतिहासीक ठेव्याला धक्का लावण्यात येत असल्यामुळे विकास आराखड्याला विरोध असल्याचेही डॉ. साठे यांनी सांगीतले.

अवश्य वाचा