चिपळूण, 

चिपळूण तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाले असताना 25 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती  - जमातींकरिता एकही जागा आरक्षित केली नसल्याने,  त्याविरोधात आक्षेप घेण्यासाठी आज चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांची भेट घेतली .

      चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे - जून महिन्यामध्ये होत आहेत . त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या प्रभाग निश्‍चिती व प्रभाग आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . त्याबाबतचे आक्षेप 14 तारखेपर्यंत नोंदवायचे आहेत . जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तालुक्यातील 83 पैकी 25 हून अधिक गावात अनुसूचित जातीं करिता एकही जागा आरक्षित करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.  वास्तविक पाहता चिपळूण तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक गावात अनुसूचित जातीचे लोक मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहेत . त्यामध्ये विशेषतः बौद्ध तथा नवबौद्ध समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत . बौद्ध समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये येतो . या समाजाला अनुसूचित जातीच्या सेवा सुविधा मिळतात .

            मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सन 2011 च्या जनगणने चा आधार घेऊन आरक्षण निश्‍चिती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून समजते . त्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये बौद्ध समाजाची योग्य प्रकारे झाली नसल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे तालुक्यातील 166 पैकी 70 गावात अनुसूचित जातीचे लोक अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे . तसेच इतर गावात चार ते 50 एवढीच लोकसंख्या दर्शवलेली आहे . त्यामुळे चार दोन गाव वगळता अन्य गावात हे आरक्षण पडले नसल्याने या समाजावर राजकीय अन्याय झाला आहे . त्यामुळे या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्यावतीने संबंधित गावांच्या तक्रारी लक्षात घेऊन तहसीलदारांकडे आज निवेदन देण्यात आले .

 यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत ,सरचिटणीस अशोक कदम, माजी सरचिटणीस रमाकांत सपकाळ ,शिक्षण कमिटी अध्यक्ष संदेश पवार, राजू जाधव, प्रभाकर सकपाळ, विकास गमरे, प्रकाश बल्लाळ, आनंत बल्लाळ ,काशिराम कदम गुरुजी ,राष्ट्रपाल सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार