रत्नागिरी 

 गुहागर तालुक्यातील भातगाव कोसबी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने कातळ-खोद-चित्र शोधून काढले आहे. काजूर्ली व भातगावच्या सीमेवर मोकळ्या कातळ सडयावर हे कातळशिल्प उजेडात आले आहे. या गावात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या कातळशिल्पाबाबत सर्वच गावकरी अनभिज्ञ होते. या निमित्ताने कोकणातील वैशिष्टयपूर्ण कातळ शिल्पावर नव्याने प्रकाश पडला आहे.

    भातगाव कोसबी प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष रावणंग व त्यांचे सहकारी हे सातत्याने तेथील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी नुकतीच त्या परिसरातील काजूर्ली येथील बौद्ध विहाराला क्षेत्र भेटीचे नियोजन केले होते. त्या भेटीत या विहाराच्या बाजूला असणाऱया आड वजा विहीरीने रावणंग यांचे लक्ष वेधले. ही विहीर आयताकृती असून उतरण्यासाठी पायर्‍या  आहेत.

   रावणंग यांचे निवास्थान असलेल्या रत्नागिरीतील निवळी गावात अशा विहीर असून त्याच्या बाजूला 50 मीटरवर अंतरावर लिपी सदृश्य कातळ शिल्प आहेत. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन या परिसरात कातळशिल्प असण्याची शक्यता त्यांना वाटली. विद्यार्थ्यांना त्यांनी निवळीतील कातळशिल्पाचे फोटो दाखवून अशी शिल्पे शोधायची असल्याचे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांची काजूर्ली परिसरातील सडयावर कातळ-खोद-चित्र शोधमोहिम सुरू झाली.

   संतोष रावणंग व सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांसह रविवारी 5 ते 6 किमी चालत या शोधमोहिमेवर निघाले. भातगावातून काजूर्ली गावात बौद्ध विहार पाहण्यासाठी आलो याचेही भान त्यांना राहिले नव्हते. शिक्षक विजय शितप व 12 विद्यार्थी जवळपास दोन तास कातळाच्या चारी बाजूनी दोन किमी परिसरात कातळ शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यात यश आले नाही. मात्र पुन्हा शोध घेण्याचे ठरवूनच ते माघारी आले.विद्यार्थ्यांनी या शोध मोहिमेची माहिती आपल्या पालकांना दिली. दुसऱया दिवशी सकाळी विलास वेले या पालकांनी निवळीतील चित्रे पाहून अशी शिल्पे काजूर्ली परिसरात असल्याचे ऐकले आहे, अशी माहिती दिली. या माहितीने उत्साह दुणावलेल्या रावणंग व सहकाऱयांनी पुन्हा शोध घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱया रविवारच्या पुन्हा शिक्षक, विद्यार्थी व तीन ग्रामस्थ, झाडू, ब्रश घेऊन कातळशिल्प शोध मोहिमेला निघाले. तीन तुकडया करून शोध सुरू झाला.

   त्यावेळी शिक्षक रावणंग यांच्या तुकडीला परिसरातील पऱयाच्या (लहान नदी) बाजूला कातळावर एक रेष दिसली. ज्याचा शोध सुरू आहे, ते हेच असावे हे समाजल्यावर उत्साह आणखी वाढला. एक एक रेष झाडूने साफ करत चित्र उलगडण्याचा प्रयत्न सुरू झाला व त्यात यशही आले. हा आकार एखादया जंगली प्राण्यांचा किंवा थोडा डायनोसॉर सदृश दिसून आला. साधारणपणे 10 फूट लांब व मध्यभागी 6 फूट रुंद असे कातळशिल्प उजेडात आले. हे कातळशिल्प पूर्ण नसून अर्धवट स्थितीत आहे. असा प्राणी कोकणात होता का? असाही प्रश्‍न निर्माण होत  आहे.

     चित्राची साफसफाई चालू असताना शेतात जाणारे 70 वर्षांचे लक्ष्मण मोहितेही अचंबित झाले. त्यांनी सांगितले की, आमच्या 5 पिढया गेल्या, पण असे चित्र या ठिकाणी आहे हे आम्हाला माहीत नव्हते. आणखी  गावातील काही  लोकांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळते की याच परिसरात पूर्वी असे वाघाचे व गायीचे चित्र होते. पण गेल कंपनीच्या पाईपलाईन कामामुळे ते गेले असावे

 

अवश्य वाचा