कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

दोघे जखमी

। बीड । प्रतिनिधी ।

सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर कारची दुचाकीला धडक लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला असून महिलेचा मुलगा व पती हे जखमी झाले आहेत.

हा अपघात बुधवारी (दि. 25) रात्रीच्या सुमारास घडला. जालना जिल्ह्यातील महाकाळा येथील गजानन यशवंते यांचा मुलगा संकेत (5) आजारी असल्याने गेवराईहून दवाखान्यातून उपचार करून महाकाळाकडे दुचाकीवरुन आपली पत्नी मोनिका यशवंते (28) व मुलगा संकेत यांसह जात होते. दरम्यान सोलापूर- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बागपिंपळगाव येथील उड्डाणपूलाजवळ आले असता मागून येणार्‍या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नी मोनिका यशवंते यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गजानन यशवंते व मुलगा संकेत हे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक व त्याचा साथीदार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version