गुंगीचे औषध देऊन 3 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहरातील भर बाजारात कडधान्य विकत घेण्यासाठी आलेल्या भामटयांनी बोलण्यात गुंतवून विक्रेत्याला ज्युसमधून गुंगीचे औषध पाजून त्यांच्या अंगावरचे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून पलायन केल्याने खळबळ माजली आहे. गुरुवारील दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
अलिबाग शहरातील कान्होजी आंग्रे समाधीच्या मागील बाजुस असणा-या बाजारपेठमध्ये मिलिंद खोत हे भिजवलेले कडधान्य विकतात. त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी पेण येथून आल्याचे सांगत पाच किलो कडधान्य खरेदी केली. दोन दिवसांनी दोघांनी आम्हाला आणखी 20 किलो कडधान्य हवे असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर गुरुवारी या दोघांनी पेण येथून जाफर मुकादम यांची भाड्याने वेगनर कार घेवून परत येऊन सांगितलेल्या कडधान्याची खरेदी करण्यासाठी आल्याचे भासवले.
कडधान्य घेतल्यानंतर गाडीत ठेवले. पण आपल्याकडे पैसे कमी असून एक सहकारी विद्यानगर येथे आहे त्याच्याकडून पैसे घेवून देतो असे सांगत त्यांना कार मध्ये बसवले. बोलताना आपल्याकडील ज्युस त्यांनी खोत आणि चालक मुकादम यांना पिण्याचा आग्रह केला. त्यानुसार सदर ज्युस प्राशन करताच त्यांना गुंगी आली. त्यानंतर त्यांना गाडीत ठेवून त्यांच्या अंगावरील सुमारे 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढुन घेत दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत गाडीत सोडत त्या भामटयांनी पलायन केले.
सदर प्रकार उघडकीस येताच मिलिंद खोत यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. आणि अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 328, 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पाटिल हे करीत आहेत. यापूर्वी देखील अलिबाग सह जिल्ह्यात अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.