| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार काळीज खरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद म्हामुनकर हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
बी.एस. बुटाला सभागृहासमोर महामार्गावर प्रवेश करत असलेली दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरवाडी येथे दुचाकी आणि कारमध्ये हा अपघात होऊन तालुक्यातील प्रमोद महामुणकर गंभीर जखमी झाले. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातातील कार मुंबईच्या दिशेने जात होती, तर प्रमोद म्हामुणकर हे आपल्या दुचाकीवरून बिरवाडी येथे घरी जात असतानाच हा अपघात झाला.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम आजही अपूर्ण असल्याने अपघाताची मालिका कायम राहिली आहे. गेल्या आठवडाभरात दासगाव आणि परिसरामध्ये सातत्याने अपघात होत आहेत. वारंवार महामार्ग कामासाठी बंद ठेवून एकेरी वाहतूक ठेवणे, पर्यायी महामार्गाने वाहतूक वळवणे असे प्रकार केले जात आहेत. त्यातच ठिकठिकाणी सर्व्हिस रस्त्यावरून योण्या-जाण्यासाठी चुकीचे मार्ग ठेवल्याने हे अपघात घडत आहेत. याबाबत महामार्ग विभागाला निदर्शनास आणूनदेखील हे प्रवेश बंद न केल्याने अपघात होत असल्याचे भाजपचे पदाधिकारी महेश शिंदे यांनी सांगितले.