| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथील डिंपल वाईन शॉपचे शटर तोडून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. याबाबत दि.6 ऑगस्ट रोजी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी डिंपल वाईन शॉपचे शटर तोडून सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल आणि 55 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. त्यानंतर गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले. पथकाने रसायनी तसेच आसपासच्या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रतीक सावंत यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी कर्जत येथे घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव रामनिवास मंजु गुप्ता (38) असे असून, कल्याण (प.) आधारवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरफोडी करणारा आरोपी ताब्यात
