| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीगिरांची नव्या संसद भवनासमोर पंचायत घेण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, खाप महापंचायतने आंदोलनासाठी हाच दिवस आणि हेच केंद्र निश्चित केले आहे.
खाप महापंचायतीचाच आधार घेत कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी 21 मेपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीनंतर खाप महापंचायतीचे पदाधिकारी जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल, असे स्पष्ट केले होते. रविवारी सायंकाळी खाप पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची रोहतक येथे बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलन नव्या संसद भवनासमोर नेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला कुस्तीगीर साक्षी मलिक, तिचा पती सत्यव्रत कडियान उपस्थित होते. बजरंग पुनिया व विनेश फोगट जंतरमंतर येथेच थांबले होते. बजरंगने खाप पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. आता महिला कुस्तीगिरांना पुरुष कुस्तीगिरांचा पाठिंबा राहणार की नाही, याचा निर्णय पुढे घेण्यात येईल, असे पुनिया म्हणाला.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक समितीने नियुक्ती केलेली हंगामी समिती 20 जून रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणी घेणार आहे. आता यासाठी कुस्तीगिरांकडे सरावासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आंदोलनातील सहभागी कुस्तीगिरांची भूमिका काय राहणार हा प्रश्न नव्याने उपस्थित राहिला आहे.