| अलिबाग | प्रतिनिधी |
जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अलिबागमध्ये जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळच्या मोर्चात समन्वय समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप नागे, सरचिरटणीस प्रभाकर नाईक, परशुराम म्हात्रे, रत्नाकर देसाई, प्रफुल्ल कानिटकर, अलिबाग तालुका सरचिटणीस दर्शना कांबळे, निला देसाई, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस प्रफुल्ल पाटील, रायगड जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण भांदुर्गे, विकास पवार, सचिन जाधव, नीलेश तुरे, दिपक पाटील, प्रमोद भोपी, आदी पदाधिकारी, व कर्मचारी सहभागी झाले होते.
आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर बैठका झाल्या आहेत. सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. मात्र त्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकार उदासीन ठरल्याने या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अनुकंपतत्वावरील नियुक्ती करण्यात यावी, शिक्षणाचे खासगीकरण रद्द करावे, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.