| कोळा | वार्ताहर |
शेकापमुळे सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळत असल्याचा दावा किडबिसरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लोणारी समाजाचे जेष्ठ नेते अरुण आबा घेरडे यांनी केला आहे.
शेकाप तसेच गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेताना घेरडे यांनी सांगितले की, सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा परंपरागत बालेकिल्ला. सांगोला विधानसभा मतदारसंघात स्व. गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. एवढा विश्वास सांगोल्यातील जनतेने आबासाहेबांवर दाखवला तसाच विश्वास स्व.आबासाहेबांचाही सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेवर होता. आबासाहेबांनी राजकारण करीत असताना सर्व समाजघटकांना न्याय दिला असल्याचेही त्यांनी सुचित केले.
वेगवेगळ्या सहकारी संस्था आहोत की स्थानिक स्वराज्य संस्था असोत आबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी दिली. कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. सर्व समाजघटकांतील कार्यकर्त्यांना अनेक पदांवरती काम करण्याची संधी दिली त्या त्या कार्यकर्त्यांनी त्या संधिचे सोने केले ही सुध्दा वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आबासाहेबांनी जिल्हा परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत ज्या समाजाची लोकसंख्या इतर समाजापेक्षा जास्त आहे.. त्या समाजाला उमेदवारी न देता एका अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देऊन निवडूण आणून दाखवले आहे. लोकांनी सुध्दा त्या उमेदवारांना प्रचंड प्रमाणात मतदान करुन निवडूण देण्याची किमया फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करुन दाखवली आहे, असे मत घेरडे यांनी व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्ष हा जातीपातीचे राजकारण करीत नाही व आशा राजकारणाला पक्षातील कार्यकर्ते महत्व देत नाहीत. कारण तालुक्यातील बहुतांश अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते हे तीन पिढ्याहून शेकापसोबत राहीलेले आहेत व आजही निष्ठेने राहतात कारण शेतकरी कामगार पक्षात जातीवदाला बिल्कुल थारा नाही. शेकापक्षात सर्वांना संधी मिळते भले ती संधी कमीआधिक प्रमाणात मिळत असेल अथवा मागे पुढे मिळत असेल परंतु मिळणार हे नक्की आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष हा लोकशाहीच्या माध्यमातून काम करणारा पक्ष आहे. पक्षाचे ध्येय हे सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास करणे हा असल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष सर्वांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजसुद्धा शेतकरी कामगार पक्षात जे प्रमुख नेते आहेत ते एकदिलाने काम करीत आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती निवड झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावातील वेगवेगळ्या समाजातील कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना आपलेसे केले आहे. ते सुध्दा आबासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकून सर्व समाजघटकाऩा आपलेसे करीत आहेत व शक्य त्या ठिकाणी सर्व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेत्यांना विश्वासात घेऊन अनेकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. शेतकरी कामगार पक्षाची परंपरा कायम पुढे चालु ठेवण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करीत आहेत, असे ते म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षात अनेक अभ्यासू नेते आहेत. तसेच नव्या उमेदीचे युवा कार्यकर्ते आहेत यांचा समतोल साधत बाबासाहेब देशमुख यांचेही काम पहावयास मिळत आहे. कारण आबासाहेबांनी जो विचार घालून दिला आहे तो विचार पुढे घेऊन जात असताना जे काही करावयास लागत आहे ते डॉ. बासाहेब देशमुख त्यांचे जेष्ठ मार्गदर्शक व युवा सहकारी करताना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारधारेवरती चालणारा पक्ष आहे पुरोगामी विचारधारेला समाजातील सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे अभिप्रेत आहे. तेच अभिप्रेत असलेले काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे व तीच परंपरा आजही पुढे चालु असल्याचे मत घेरडे यांनी व्यक्त केले.